चिंचवडची पोट निवडणूक अजूनही तिरंगीच!

२०१२ पासून दोन महापालिका निवडणुका आणि दोन विधानसभा निवडणुकांसह ही तिसरी चिंचवडची पोट निवडणूक होते आहे. या अकरा वर्षांच्या कालावधीत पिंपरी चिंचवड च्या मतदारांनी अनेक आश्वासने आणि आमिषे पहिली आणि ऐकली आहेत. मात्र, या शहराच्या हाती वाट पाहण्या व्यतिरिक्त काही लागले नाही हा इतिहास आहे. आताही चिंचवड विधानसभेची पोट निवडणूक होत असताना राज्यातील सत्ताधारी शिंदे फडणवीस यांचे सरकार आणि विरोधी महाविकास आघाडी यांनी शहराला भरघोस आश्वासने आणि आमिषे दिली आणि दाखविली आहेत. शहराचे प्रश्न कोण खऱ्या अर्थाने जाणून घेणार आणि शक्य तेव्हढी सोडवणार याची वाट मतदार पहात आहेत. चिंचवडच्या या पोट निवडणुकीत एकूण अठ्ठावीस उमेदवार रिंगणात आहेत. मात्र खरी तिरंगी लढतीची निवडणूक, ज्यांच्या निधनाने ही पोट निवडणूक होते आहे, ते भाजपचे कालवश आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पत्नी भाजपच्या अश्विनी जगताप, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विठ्ठल उर्फ नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यातच पाहायला मिळते आहे. 

उद्या दि. २६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या निवडणुकीचा प्रकट प्रचार संपला आहे. या तीनही उमेदवारांनी आपली ताकद पणाला लावून प्रचार केला आहे. तीनही उमेदवार विजयावर आपला दावा सांगत आहेत. मात्र, या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत कोण बाजी मारतो, हे सांगणे कठीण आहे. आतापर्यंत या निवडणुकीत न भूतो, न भविष्यती असा प्रचाराचा धुराळा उडवण्यात आला. भाजपच्या वतीने उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांसह डझनभर मंत्री, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांसह डझनभर माजी मंत्री आणि आमदार या पोट निवडणुकीच्या प्रचारात अक्षरशः राबले. स्थानिक नेत्यांची भक्कम मोट बांधण्याचा यशस्वी प्रयत्न पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. त्याचबरोबरीने अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या वतीने एकटे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची सभा झाली असली तरी पूर्ण निवडणुकीत सामान्य मतदारांपर्यंत पोहोचण्याचा कार्यक्रम आखून या पोट निवडणुकीत आपले आव्हान कायम ठेवले.

चिंचवडची ही पोट निवडणूक भाजपच्या कालवश आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या निधनाने लागली. लक्ष्मणभाऊंच्या निधनाची सहानुभूती मिळण्यासाठी भाजपने त्यांच्या विधवा पत्नीला उमेदवारी दिली असली तरी, ही सहानुभूती भाजपने गमावली असल्याचेच स्पष्ट झाले आहे. लक्ष्मणभाऊ जगताप यांचे निधन ३ जानेवारी रोजी झाले आणि राज्य निवडणूक आयोगाने २१ जानेवारी रोजी पोट निवडणुकीची घोषणा केली. लक्ष्मणभाऊंची महिन्याची भाकरही होऊ द्यायची वाट भाजपने पहिली नाही. निवडणूक जाहीर झाल्यावर पिंपरी चिंचवड शहरातील स्थानिक भाजपाई नेत्यांनी अभेद्य गड असलेल्या भाऊंच्या घरातच भाऊबंदकी माजवल्याचे चित्र, अजूनही पुसले गेलेले नाही. त्यामुळे या निवडणुकीत भावनेचा मुद्दा जोपासण्यात भाजपला यश मिळाले नाही. मग भाजपच्या राज्यातील नेत्यांनी विकासाचा मुद्दा चालवून पहिला. मात्र त्यातही चिंचवडची पोट निवडणूक अडकली नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसने विकासाचा मुद्दा आणि भाजपच्या पिंपरी चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा लावून धरला. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे यावेळी प्रथमच कोणताही विस्कळीतपणा निर्माण होऊ न देता सांघिक आणि संघटित निवडणूक लढण्याचा प्रयत्न केला आहे. आता दिवसा एक आणि रात्री दुसरेच हा राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचा जुना खेळ यावेळीही चालला किंवा कसे यावर खरे म्हणजे त्यांचे यश अवलंबून आहे. यापूर्वी लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या सर्व निवडणुकांचे विजय राष्ट्रवादी काँग्रेस च्या कर्तृत्व आणि नेतृत्वाखालीच झाले आहेत, हे उघड गुपित आहे. अगदी २०१९ च्या निवडणुकीतही राष्ट्रवादी लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या उपयोगी पडली असल्याचे अनेक स्थानिक नेते खाजगीत सांगतात. यावेळीही तसे झाले तर, राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांचा घात अटळ आहे. नामदार अजितदादा पवार यांनी निवडणुकीची ही मोट भक्कम केल्याचे दृश्य तर आहे, मात्र स्थानिकांची फितरत बदलणे महत्त्वाचे.

या निवडणुकीचा सगळ्यात गडद तिसरा रंग अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचा आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप सोडून सर्व पक्षांचा जाहीर पाठिंबा होता म्हणून मोठे मतदान राहुल कलाटे घेऊ शकले, असे बोलले जाते. मात्र, मग राष्ट्रवादीचा त्यावेळच्या कर्तृत्वाचा विचार केला तर ती मते कलाटे यांच्या कर्तृत्वाची होती असे म्हणण्यास जागा आहे. तळच्या मतदारांना भेटून त्यांच्या जाणीव जागृत करण्याचा प्रयत्न राहुल कलाटे यांनी केला आहे. आपला पूर्ण वेळ मतदारांमध्ये घालवल्यामुळे मतदारांशी सरळ संपर्कात आलेले उमेदवार म्हणून त्यांच्या बाजूनेही मतदार आहेत हे स्पष्ट आहे. आता राहुल कलाटे कोणाच्या मतांमध्ये सेंधमारी करतात आणि कितपत करतात यावर त्यांचेही भवितव्य अवलंबून आहे.

उद्या २६ फेब्रुवारी रोजी मतदान आहे. आजचा पूर्ण दिवस आणि आजच्या रात्रीसह उद्याचा दिवस चिंचवड विधानसभा मतदारसंघात “गांधींचा” बोलबाला असणार आहे. “गुलाबी गांधी आणि हिरवे गांधी” मतदारसंघात यथेच्छ फिरताना दिसत आहेत. काही ठिकाणी त्यांचा वावर आणि वापर झाल्याचे दिसूनही आले आहे. अर्थातच आता ही “गांधीगिरी” काय करिष्मा दाखवते यावरही ही चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोट निवडणूक अवलंबून राहणार आहे.

————————————————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×