स्थानिक नेत्यांची खेकडा वृत्ती राष्ट्रवादीच्या पराभवाचे कारण!

मसळी बाजारातील खेकडा विकणारा खेकड्याच्या हाऱ्याला झाकण लावायच्या फंदात पडत नाही. कारण हे खेकडे हाऱ्यातून बाहेर पडणाऱ्या खेकड्याच्या उरावर चढून त्याला खाली ढकलतात. त्यातूनही एखादा बाहेर पडलाच तर, मासेवाला त्याला अलगद उचलून पुन्हा हाऱ्यात टाकतो. तशीच काहीशी परिस्थिती पिंपरी चिंचवड शहरातील स्थानिक नेत्यांची आहे. नुकत्याच झालेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोट निवडणुकीत हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. ही खेकडा वृत्तीची स्थानिक पुढारी मंडळी एकमेकांना खाली ढकलण्यात इतकी मश्गुल आहेत, की, आपल्या या वृत्तीमुळे आपण स्वतःही हाऱ्यातून बाहेर पडू शकत नाही, त्यामुळे आहे तिथेच आपले वाटोळेगोटोळे होणार, याचेही भान या मंडळींना नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विठ्ठल तथा नाना काटे यांचा सुमारे छत्तीस हजार मतांनी झालेला पराभव याच खेकडा वृत्तीचा परिपाक आहे. अर्थात हे मान्य करण्याची तयारी कोणाचीही नसली तरी सत्य नक्कीच लपत नाही.

चिंचवडच्या पोट निवडणुकीत महाविकास आघाडीची उमेदवारी कोणाला यावर बरीच चर्चासत्रे झडली आहेत. गेल्या २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून निवडणूक लढायला अनेकांनी नकार दिल्यावर शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार राहूल कलाटे यांना भाजप व्यतिरिक्तच्या सर्व पक्षांनी पाठिंबा दिला. राहुल कलाटे यांनी चांगली लढत देऊन या निवडणुकीत रंगत आणली. त्यावेळी देखील राष्ट्रवादीच्या गोटातून भाजपचे उमेदवार लक्ष्मणभाऊ जगताप यांना मतांची रसद पुरविण्यात आली, हे उघड गुपित आहे. आता लक्ष्मणभाऊंच्या निधनाने पोट निवडणूक आल्यावर खरे म्हणजे पुन्हा राहुल कलाटे यांच्यावर भरवसा ठेवणे गैरलागू नव्हते. मात्र, कोणतीही तयारी नसताना, आपलाच एडका ढुसण्या मारू शकतो, अशी मल्लिनाथी राष्ट्रवादीच्या काही जणांनी केली. वस्तुतः ही पोट निवडणूक होणार हे गृहीत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे भाऊसाहेब भोईर सोडले तर, एकाही उमेदवाराने निवडणुकीसाठी कोणतीही तयारी केली नव्हती, हे स्वयंसिद्ध सत्य आहे. लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या निधनानंतरच आख्खी राष्ट्रवादी जागी झाली.

उमेदवार बदलला! 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंडळींनी आम्हालाच उमेदवारी द्या, असा आग्रह केवळ आपली पुढची खेळी म्हणून केला होता. विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजितदादा पवार कष्ट करणारच आहेत, या गृहितकावर राष्ट्रवादीच्या उमेदवारांची मदार होती. निवडणुकीची पूर्वतयारी केवळ राष्ट्रवादीचे भाऊसाहेब भोईर आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे राहुल कलाटे यांनीच केली होती. नामदार अजितदादा पवार यांनी निवडणूक जाहीर झाल्यावर या निवडणुकीचा ताबा मावळचे आमदार सुनीलअण्णा शेळके यांच्याकडे दिला. राष्ट्रवादी कडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आदल्या दिवशी उत्तररात्री पर्यंत राहुल कलाटे हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील असे संकेत अजितदादा पवार आणि सुनीलअण्णा शेळके यांच्याकडून दिले जात होते. मग अवघ्या आठ तासात असे काय झाले की, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा नामदार अजितदादा यांनी उमेदवार बदलला?

भाजपसाठी निवडणूक सोपी करण्याचा हा उपद्व्याप केवळ काही मंडळींच्या वेड्या आग्रहाखातर राष्ट्रवादीने केला, अशी चर्चा त्याचवेळेपासून चिंचवड मतदारसंघात सुरू झाली. आख्ख्या राष्ट्रवादीने या निर्णयाने आपली गत  “पोरासोरावारी गेली आणि डाव खराब करून आली” अशीच करुन घेतली. जी मंडळी उर बडवून आमच्यापैकीच कोणालाही उमेदवारी द्या, असा आग्रह धरीत होती, त्यांच्या भागात राष्ट्रवादीच्या उमेदवाराला किती मते मिळाली याचा लेखाजोखा मांडला तर, हा आग्रह म्हणजे केवळ “ताकात डेंगणं, सासुही खाईना आणि सूनही गिळेना” असाच प्रकार होता हे लक्षात येईल. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या निवडणुकीत राष्ट्रवादीला आपल्याकडच्या मुद्द्यांची मांडणी मुद्देसूदपणे मांडताच आली नाही. त्यामुळे ही निवडणूक अक्षरशः मस्करीवारी गेली, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

मेहनत वाया गेली?

महत्त्वाचे म्हणजे या निवडणुकीत पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसने अगदी तळाच्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी चांगली व्युहरचना केली. याचे श्रेय्य ज्यांच्या ताबेदारीने ही निवडणूक झाली, ते मावळचे आमदार सुनीलअण्णा शेळके, पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजितजी गव्हाणे, युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट आणि त्यांच्या सगळ्या चमूला द्यावे लागेल. मतदान खोली, मतदान केंद्र, प्रभाग अशा तळाच्या पातळीपर्यंत समन्वयक नेमण्यात आले होते. प्रत्येक स्थानिक नेते आणि बाहेरून आलेले नेते यांचा समावेश करून शेवटच्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचा कार्यक्रम आखण्यात आला होता. याचा परिपाक म्हणून चिंचवड विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या उमेदवाराची मजल लाख मतांच्या जवळपास पोहोचली. मात्र, विजयासाठी लागणारा आकडा दुर्दैवाने ही मंडळी गाठू शकली नाहीत. त्यामुळे ही मेहनत या वेळी वाया गेली असली तरी, असे काटेकोर नियोजन करता येते याची जाणीव पहिल्यांदाच पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना झाली, हे ही नसे थोडके.

मात्र, उमेदवार ऐनवेळी बदलण्याची करणे काय, हे अजूनही गुलदस्तात आहे. राहुल कलाटे यांची बंडखोरी राष्ट्रवादीच्या पराभवाला कारणीभूत होती, हे खरे असले तरी, राहू कलाटे यांना डावलून विठ्ठल तथा नाना काटे यांना उमेदवारी दिल्यानेच ही बंडखोरी झाली, हेही तितकेच खरे. शिवाय राष्ट्रवादीच्या स्थानिक मंडळींनी ही निवडणूक फारशी गांभीर्याने घेतली नाही, हेही अधोरेखित झाले आहे. नामदार अजितदादा पवार राष्ट्रवादीच्या इतर शिर्षस्थ नेत्यांभोवती कोंडाळे करून गर्दी दाखविणे आणि भाषणात चिठ्ठ्या देणे यांव्यतिरिक्त काहीही न करणारी स्थानिक मंडळी, नुसते दिसण्यासाठी फिरणारी मंडळी, हजेरी लावणारी मंडळी अशा विविध प्रकारात ही स्थानिक मंडळी विखुरली होती. त्यामुळे जे कार्यमग्न राहून यंत्रणा राबवित होते, त्यांच्या कामाचे चीज झाले नाही.

कोणत्याही प्रकारे निवडणूक जिंकायचीच ही विजीगिषु वृत्ती राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्याध्ये दिसलीच नाही. उमेदवार निवडून आले तर, त्याला बाप म्हणावे लागेल, या भीतीनेच प्रत्येकाला ग्रासले होते. त्यातल्या त्यात नामदार अजितदादा पवार यांच्या जीवावर मोठ्या झालेल्या मंडळींनी आपले राजकीय भवितव्य आणि फुकाची महत्ता जपण्यासाठी अंग चोरून काम केले, हे स्वयंस्पष्ट आहे. उमेदवारी बदल आणि स्थानिकांची खेकडा वृत्ती ही पराभवाची मुख्य कारणे आहेत. मात्र राहुल कलाटेंनी अजितदादा आणि सुनीलअण्णा यांचे देखील ऐकले नाही, असे वरतोंडाने सांगून त्यांचा अहंकार कुरवळण्यापेक्षा सत्य सांगून आग्रह धरणारी मंडळी स्थानिकांमध्ये नाहीत हे दुर्दैव. पक्षहीत, पक्षअस्मिता या बाबींचा राष्ट्रवादीत अभाव आहे, हे या निवडणुकीचे खरे चित्र आहे.

सुनीलअण्णा शेळके यांच्याबाबत स्थानिकांना दचकदिवा!

पिंपरी चिंचवड शहरातील स्थानिकांमध्ये विधानसभा निवडणुकीत पराभवाचाच अनुभव असलेले लोक होते म्हणून, निवडून आलेल्या शेजाऱ्याकडे नामदार अजितदादा पवार यांनी चिंचवडच्या या पोट निवडणुकीचा ताबा दिला. मावळचे आमदार सुनीलअण्णा शेळके यांनी निवडणुकीची आखणी चांगली केली. अर्थात शहराध्यक्ष अजितजी गव्हाणे आणि ज्यांना ही निवडणूक अनुभव म्हणून पहायची आणि जोखायची होती, ते सर्व कार्यकर्ते या निवडणुकीत झटले आणि खपले. मात्र, सुनीलअण्णा शेळके आता आपले नेते होणार काय या भीतीने काही स्थानिक पुढाऱ्यांना पुरते ग्रासले होते. शिवाय सुनीलअण्णा शेळके यांनी जशी अंगावर घेऊन मावळची निवडणूक जिंकली, तीच पद्धत इथेही वापरली असती, तर वेगळे चित्र दिसले असते. मात्र, निवडणूक अंगावर घेऊन लढण्याची इथल्या उमेदवारासह स्थानिक नेत्यांची ना तयारी होती, ना हिम्मत. शेळके मोठे होणार, राहुल कलाटे अगर नाना काटे शहराचे नेते होणार, हा दचकदिवा मात्र, इथल्या स्थानिकांमध्ये कायम होता आणि त्यातूनच निवडणूक हातची गेली. ही खेकडा वृत्ती नष्ट झाली नाही, तर पुढच्या कोणत्याही निवडणुक सांघिक पद्धतीने लढून जिंकणे राष्ट्रवादीसाठी दुरापास्त ठरणार आहे.

————————————————————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×