चिंचवड जगतापांचेच, लक्ष्मणभाऊंचा करिष्मा कायम! (भाग एक)

कोणी काही म्हणाले तरी चिंचवड विधानसभा मतदारसंघावर अजूनही लक्ष्मणभाऊ जगताप यांचाच पगडा आहे आणि त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप केवळ भाऊंच्या करिष्म्यावर निवडणूक जिंकल्या आहेत. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेवर पोट निवडणुकीत त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप छत्तीस हजारांहून अधिक मताधिक्य मिळवून विजयी झाल्या. या तिरंगी निवडणुकीत महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विठ्ठल तथा नाना काटे यांना उणीपुरी लाखभर तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना चौवेचाळीस हजारांहून अधिक मते मिळाली. महाविकास आघाडीकडून त्यातल्यात्यात राष्ट्रवादीकडून एकास एक उमेदवार असते तर, विजय आमचाच होता असा दावा करण्यात आला असला तरी निवडणूक तिरंगी होण्यातही राष्ट्रवादी काँग्रेसमधील खेकडा वृत्तीच कारणीभूत आहे, यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र, चिंचवडवर लक्ष्मणभाऊ जगताप यांचाच पगडा आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या निवडणुकीत उमेदवारी मिळण्याअगोदर असलेला कौटुंबिक बेबनाव मिटल्यामुळे, लक्ष्मणभाऊ जगताप यांचे बंधू शंकरराव जगताप यांनी नेहमीप्रमाणे आपली स्वतःची यंत्रणा लावून निवडणूक सोपी केली. अर्थात त्यासाठी भाजपच्या शिर्षस्थ नेत्यांनी मोठ्या शिताफीने जगताप यांच्या कौटुंबिक वादावर पडदा टाकण्यात यश मिळवले. तसे पाहिले तर आतापर्यंतच्या लक्ष्मणभाऊंच्या राजकीय प्रवासात भाजप पेक्षा राष्ट्रवादीचीच मदत झाली आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघात काही मोजके भाग सोडले तर भाजपचे वर्चस्व नाही. मग अश्विनी जगताप यांनी मिळालेली एक लाख पस्तीस हजारांहून अधिकची मते आली कुठून हा प्रश्न निर्माण होतो. ही संपूर्ण निवडणूक नेहमीसारखी लक्ष्मणभाऊ जगताप यांच्याच पद्धतीने हाताळली गेली. अनेक घटकांची मदत नेहमीप्रमाणेच या निवडणुकीतही अश्विनी जगताप यांना झाली. हे अनेक घटक कोणकोणते आहेत, यावर अनेक चर्चा आणि शंकाकुशंका आहेत.

अश्विनी जगताप याच्या विजयाचे शिल्पकार कोण?

मुळात अश्विनी जगताप यांचा विजय लक्ष्मणभाऊ यांचा विजय आहे. भाजपने लावलेली यंत्रणा आणि अनेक घटकांची झालेली मदत या विजयला सुमारे छत्तीस हजारांच्या फरकापर्यंत घेऊन आली. याबरोबरच राष्ट्रवादी मधूनही मोठी मदत या निवडणुकीत जगतापांना झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने मुळात उमेदवार बदलून जगतापांना हवा तो उमेदवार दिला, त्यामुळे बंडखोरी झाली. जगताप यांच्या विरोधातील मतात पडलेली उभी फूट हे एक महत्त्वाचे कारण आहे. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणकोणत्या मंडळींनी सरळ जगतापांना मदत केली, यावरही संशोधन व्हायला हवे. काही मंडळी आपला काही संबंध नाही या भावनेने फक्त मिरवण्यापूरती या निवडणुकीत होती, तर काही मंडळी उगाचच एकमेकांना दूषणे देऊन वातावरण भाजपला पोषक करीत होती. उमेश चांदगुडे यांसारखे काही घटक कुठेही नसताना अश्विनी जगताप यांच्या निवडणुकीचा भाग बनले होते.

प्रचार यंत्रणेत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अनेक मंत्री यांसह शासकीय यंत्रणा वापरून सरळ मतदारांपर्यंत पोहोचण्याचा यशस्वी प्रयत्न भाजपने या निवडणुकीत केला. त्याचबरोबरीने ज्या मतदारांपर्यंत संपर्क झाला, त्यांना मतदान केंद्रांपर्यंत घेऊन येण्यात भाजपचे लोक, किंबहुना, जगतापांचे लोक यशस्वी झाले. मतदारांपर्यंत ” गांधी” पोहोचविण्यात भाजपाई पूर्ण यशस्वी झाले. या सगळ्याचा एकत्रित परिपाक भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचा करिष्मा अबाधित राखण्यात झाला. पुन्हा एकदा चिंचवड लक्ष्मणभाऊ जगताप यांचेच, हे अधोरेखित झाले.

————————————————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×