आम्ही आज दोन वर्षाचे झालो!

आजपासून बरोबर दोन वर्षांपूर्वी आमचे परमस्नेही तुळशिदासजी शिंदे यांच्या आग्रहाखातर आणि गौरव साळुंखे यांच्या सहकार्याने “नवनायक” या संगणकीय बातमीपत्राची सुरुवात झाली. लिहिण्याची इच्छा आणि व्यक्त होण्याचे व्यासपीठ म्हणून सुरुवातीला या प्रकाराकडे पाहताना काहीशा “गाजराची पुंगी” पद्धतीने आम्हीही हा प्रकार हाताळण्याचा निर्णय घेतला. नवीन व्यासपीठ आणि त्याचे तंत्रज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला अडखळत का होईना पण आपले विचार आणि जनसामान्यांचे म्हणणे लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न सुरू केला. गेली उणीपुरी छत्तीस वर्षे मुद्रित माध्यमांच्या माध्यमातून जे काम करीत होतो, तेच या नवीन प्रकारात करता येते, याचा भरवसा हळूहळू निर्माण झाला आणि बऱ्यापैकी हे बातमीपत्र अगर आपले आणि जनसामान्यांचे म्हणणे मांडण्याचे ठिकाण हाताळण्यास वाकबगार होत गेलो. पहिल्या वर्षात अत्यंत खरेपणाने आणि कोणतीही भीडभाड न ठेवता काम सुरू ठेवले. वाचकांनी त्याला भरभरून दाद दिली. पहिला वर्धापन दिन साजरा करताना काही निवडक लेखांचा संग्रह प्रसिद्ध करण्यात आला.

वाचकांनी त्यालाही दाद दिली. आमचे हे “नवनायक” नावाचे बाळ रांगतारांगता कधी चालू लागले आणि पळू लागले, हे कळलेच नाही. मात्र, या दुसऱ्या वर्षात आमच्या काही वैयक्तिक अडचणी आणि नाईलाज झाल्याने, म्हणावे तसे काम जमले नाही. तरीही वाचकांनी या लिखाणाला भरभरून प्रतिसाद दिला. गेल्या दोन वर्षात महिन्याला सुमारे दहा हजार असे सुमारे अडीच लाख लोकांनी “नवनायक” ला भेट दिली, त्याचबरोबर अनेकांनी बऱ्यावाईट प्रतिक्रियाही दिल्या.  याचे मूळ कारण म्हणजे सर्वसामान्यांचा विचार आणि प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला गेला. पत्रकारिता अगर लिखाण कोणासाठी करावयाचे याचे भान आणि जाण ठेऊन काम करण्याचा प्रयत्न चालूच ठेवला. प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना आरसा दाखवितानाच प्रश्न विचारण्याचा सदोदित प्रयत्न केला. सर्वसामान्यांना पडणाऱ्या प्रश्नांचे उत्तर, त्यांचा प्रतिनिधी म्हणून प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांकडून मिळविण्याचा सातत्याने प्रयत्न केला. 

काहीवेळा त्यासाठी कठोरपणे शाब्दिक कोरडे ओढले, तर काही वेळा चांगल्या हेतूंची सराहना देखील केली. मात्र, नेहमीप्रमाणे लांगुलचालन करणारे विचार कधीच मांडले नाहीत. प्रसिद्धी माध्यमांना बटीक समजणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून दिली. चार चव्वल फेकले की काहीही छापून आणता येते, हा सत्ताधाऱ्यांचा, राजकारण्यांचा आणि प्रशासनाचा गैरसमज पुसून टाकण्याचाही प्रयत्न सातत्याने केला. पत्रकारिता करताना सत्य मांडण्यासाठी सतत काम केले. अर्थात त्यातून आर्थिक गणिते मांडण्याचा प्रयत्न कधीही जाणूनबुजून केला नाही. मात्र, काही हितचिंतकांनी स्वतःहून अर्थकारणास सहाय्य केले. त्यातील काहींनी तर अगदी अनपेक्षितपणे मदत केली. केवळ लिखाण आणि लिखाणाची एकूणच पद्धत आवडून काही हितकारकांनी काही कमी पडू दिले नाही. 

या दोन वर्षात अनेकांच्या भाऊगर्दीत “नवनायक”ने आपले वेगळेपण जोपासण्याचा प्रयत्न केला. “सामन्यातील असामान्यत्व जोपासण्याचे माध्यम” म्हणून काम करताना दर्जेदार आणि मार्मिक लिखाण देण्याचा मानस राखला. त्याचबरोबर बातमीमागची माहिती समोर आणून त्यावर लोकहिताचे भाष्य करण्याचा हा प्रकार वाचकांच्या पसंतीस उतरला हे महत्त्वाचे. सामान्य बातम्या आणि खबरी लोकांपर्यंत पोहोचविण्या ऐवजी त्यांचे विश्लेषण आणि त्यामागची खरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या या पद्धतीला आपली सर्वांची जी पसंती मिळाली, त्यासाठी यच्चयावत जनांचे हार्दिक आभार! हा प्रयत्न यावज्जीव करीत राहण्याची प्रेरणा आपणाकडून सतत मिळो याच अपेक्षा!

———————————————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×