शहर राष्ट्रवादी अजितदादांबरोबर, अजित गव्हाणे टीम भुजबळ सेंटरकडे रवाना!

पिंपरी चिंचवड शहरातील बाटग्या भाजपाईंचे पुरते वांदे करणारा आणि स्वतःच्या राजकारणाला गोत्यात आणणारा निर्णय काल शहर राष्ट्रवादीने घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणीची बैठक काल ४ जुलै रोजी राष्ट्रवादीच्या शहर कार्यालयात झाली. शहर कार्यकारिणीने एकमताने अजितदादा पवार यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. याबाबत बोलताना राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी शहराच्या विकासाचा मुद्दा मांडला. १९९१ पासून या शहरात अजितदादा पवार यांच्या विचारातून विकास झाला आहे. आम्ही सर्व अजितदादांच्या मार्गदर्शनावर आणि नेतृत्वावर इथपर्यंत आलो आहोत. शरद पवार साहेबांवर आमचीही श्रद्धा आहेच, मात्र आम्ही सर्वांनी एकमताने अजितदादा पावरांबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी शहाराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी स्पष्ट केले आहे. 

शहरात कालपर्यंत कोण कोणाबरोबर याचा संभ्रम होताच, मात्र राष्ट्रवादीच्या पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणीने निर्णय घेतला असल्याने चित्र स्पष्ट झाले आहे. शहरात शरद पवार साहेबांच्या शब्दावर काहीही सोडण्यास तयार असलेले आझमभाई पानसरे यांचे चिरंजीव निहाल पानसरे अजित गव्हाणेंबरोबर मुंबईकडे रवाना झाले आहेत. त्याचबरोबर ज्यांच्या देव्हाऱ्यात देवांबरोबर शरद पवारांचा फोटो आहे, अशा विलास लांडे यांचे चिरंजीव विक्रांत लांडे हेही अजितदादांबरोबरच असल्याची माहितीही शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी दिली आहे. काही मंडळी अजितदादांच्या शपथ विधीनंतर लगेच त्यांना शुभेच्छा देऊन आले होते त्यात प्रामुख्याने माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, भाऊसाहेब भोईर, नाना काटे आदी मंडळी होती. त्यामुळे शहर राष्ट्रवादी नक्की कोणाकडे याचा संभ्रम कार्यकर्त्यांमध्ये होता. शहर राष्ट्रवादीची सगळी टीम अजितदादांच्या बैठकीला भुजबळ सेंटरवर जाण्यासाठी रवाना झाल्यामुळे हा संभ्रम काहीसा निवळला असला तरी, राष्ट्रवादीच्या कार्यकारिणी आणि त्यांच्याशी संबंधित मंडळींव्यतिरिक्तचेही कार्यकर्ते शहरात आहेतच. त्यांचा निर्णय कळण्यासाठी कोणत्यातरी निवडणुकीची वाट पहावी लागेल.

मात्र, हे सर्व नाट्य घडत असताना पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादीमधून भाजपच्या कमळाबाईंचे मुरिद झालेल्या मंडळींच्या प्रतिक्रिया काही उपलब्ध होत नाहीत. त्या गोटात पुरता सन्नाटा जाणवतो आहे. 

————————————————————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×