शहर राष्ट्रवादीची हत्यारे अजितदादांच्या हवाली?

शहर राष्ट्रवादी काँग्रेसने आता नांगी टाकल्याची भावना पिंपरी चिंचवड शहरवासीयांमध्ये निर्माण झाली आहे. अजितदादा पवार यांनी भाजपशी मोहतर लावल्यावर पिंपरी चिंचवड शहरातील समस्त राष्ट्रवादी अजितदादांच्या गोटात दाखल झाली. देव्हाऱ्यात शरद पवारांना ठेवणाऱ्या माजी आमदार विलास लांडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसने अजितदादांच्या चरणी आपल्या निष्ठा वाहिल्या. गेल्या उण्यापुऱ्या पावणेतीन महिन्यांपूर्वी पिंपरी चिंचवड भाजपशी लढण्याचा मानस ठेऊन, तसे मनसुभे शहर राष्ट्रवादी आखीत होती. आता शहर भाजपशी जुळवून घेण्याचे सल्ले अजितदादांनी दिल्यामुळे ही करणी राष्ट्रवादीसाठी राजकीय हाराकीरी ठरणार काय, असा सवाल राजकीय जाणकार विचारीत आहेत. त्यातच नुकतेच पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादीने सभा घेऊन अजितदादा पवार यांचा सत्कार केला, या सत्कार प्रसंगी पिंपरी चिंचवड शहरातील समस्त राष्ट्रवादीच्या कार्यकारिणी कडून अजितदादांना शिवकालीन शस्त्रांची प्रतिमा देण्यात आली. त्यात एक गुर्ज, दोन आरमारी तेगा, दोन शिंगांचे बिछवे आणि ढाल यांचा समावेश होता. यावरून आपली सर्व हत्यारे शहर राष्ट्रवादी काँग्रेसने अजितदादांच्या सुपूर्द केली की काय,असा प्रश्न राजकीय विश्लेषकांना निर्माण होतो आहे.

२०१७ च्या पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपने शहर राष्ट्रवादीला अक्षरशः चितपट करीत आस्मान दाखवले. त्यानंतर अजितदादा यांच्यासह शहर राष्ट्रवादी पेटुन उठली. त्यातच भाजपाई झालेले लोक आपल्यातूनच तिकडे गेले आहेत आणि आता सत्तेचा उपभोग घेताहेत, हे अजितदादा पवार आणि समस्त शहर राष्ट्रवादीसाठी अंगाचा तिळपापड करणारे होते. त्यातही राष्ट्रवादीमधील ज्यांचे त्यांच्यातूनच भाजपाई झालेल्या मंडळींशी साटेलोटे होते, त्यांनी आपल्या तुंबड्या भरून घेतल्या. मात्र, स्थानिक राजकारणात ज्यांना माजी भाजपाई शहराध्यक्ष आमदार लक्ष्मणभाऊ जगताप आणि महेशदादा लांडगे यांच्याशी जुळवून घेणे शक्य नव्हते, त्यांनी भाजपविरोधात कुवतीनुसार ढोल बडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्वतः अजितदादा पवार यांनी या मंडळींनाही म्हणावी तशी ताकद दिली नाही. अगदी अडीच वर्षांच्या त्यांच्या राज्यातील सत्ताकाळातही त्यांनी शहर राष्ट्रवादी काँग्रेसला तितकेसे बळ दिले नाही. त्यामुळे म्हणाव्या तशा प्रमाणात शहर राष्ट्रवादी पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपाईंना विरोध करू शकली नाही.

आता तर अजितदादा पवारांनी अगदी माजी आमदार आणि तीव्र सत्ताकांक्षी असलेल्या विलास लांडे यांनाच भाजपशी म्हणजेच भाजपचे माजी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आणि भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांच्याशी जुळवून घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे शहरातील राष्ट्रवादीच्या समस्त स्थानिक नेत्यांसह समस्त कार्यकर्त्यांना, ज्या भाजपाईंच्या विरोधात गहजब करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याच समोर शब्दशः नांगी टाकावी लागणार आहे. अजितदादांचे राजकारण काय असेल ते असो, त्यांचे भाजपच्या गोटात सामील होणे कशासाठी, याचे कारणही दुय्यमच! सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अजितदादांच्या मागे मेंढरांसारखे गेलेल्या लोकांच्या राजकारणाचे काय, हा खरा प्रश्न आहे. पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसने आतापर्यंत भाजपला विरोध करून आपले अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. आता भाजपच्या गळ्यात गळे घालून इथून पुढचे राजकारण करायचे आहे. शहरातील बाटगे आणि मूळचे भाजपाई देखील या मंडळींना कितपत स्वीकारू शकतात हा खरा प्रश्न आहे.

२०१७ च्या पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा घणाघाती पद्धतीने मांडून भाजपने महापालिकेत सत्ता मिळविली. त्यानंतरच्या गेल्या सुमारे साडेसहा वर्षे महापालिकेतील भाजपच्या भ्रष्टाचारावर राष्ट्रवादीने डांगोरा पिटून टीका केली. त्यातही अजितदादा पवार यांनी शहर राष्ट्रवादीला राज्यात सत्ता असतानाही कधी पूर्ण ताकद दिली नाही, हे राष्ट्रवादीचे स्थानिक नेतेच खाजगीत कबूल करतात. अशा परिस्थितीत आता तर भाजपशी जुळून घेऊन राजकारण करण्याचा सल्ला या समस्त मंडळींना अजितदादांनी दिला आहे. उद्या महापालिकेच्या निवडणुका लागल्या, तर एकमेकांवर आरोप करून आणि एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून मैदानात उतरलेले हे कागदी पहिलवान कसल्या आणि कशा कुस्त्या खेळातील, हे सामान्य जनांच्या आकलनशक्ती पलीकडले आहे.

नुकताच पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादीने अजितदादा पवारांचा सत्कार आयोजित केला होता. या सत्कारप्रसंगी अजितदादांनी स्थानिक पातळीवरील निवडणुका या स्थानिक नेत्यांच्या निर्णयाने होतील असे आवर्जून सांगितले आहे. कोणी कोणाशी युती अगर आघाडी करायची, हे स्थानिकांनी ठरवावे असेही त्यांनी सांगितले आहे. मात्र, पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादीने अगदी आपली सर्व शस्त्रे अजितदादांच्या ताब्यात देऊन मेंढरांप्रमाणे भाजपाई गटात सामील झाले आहेत. आता राष्ट्रवादीचे शहरातील पुढचे राजकारण काय याबाबत राष्ट्रवादीच्या सामान्य कार्यकर्त्यांसह शहरातील मतदारांनाही संभ्रम निर्माण झाला आहे.

——————————————————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×