श्रीरंगअप्पा बारणेंची “हाकामारी”! युतीतील इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या पायात साप?

{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

फार पूर्वी गावोगाव हाकामारी नावाचा प्रकार चर्चेत यायचा. ही हाकामारी दिवसा कोणाच्याही नकळत गावात फिरून लोकांच्या कार्यपद्धतीवर लक्ष ठेवते आणि त्याच्या घरावर फुली मारून जाते, मग रात्री त्याच्या नावाने गावात हाका मारून त्याला अद्दल घडवत असते, अशा प्रकारच्या वावड्या उठवल्या जात असत. आपण दिवसभरात चांगले वागले नाही तर रात्री हाकामारी आपले हाल करील ही भीती घालण्यासाठी कदाचित हा प्रकार वापरात येत असावा. सध्या मावळ लोकसभा मतदारसंघात हाच प्रकार महायुतीचे उमेदवार श्रीरंगअप्पा बारणे वापरताना दिसताहेत. महायुतीतील शिंदे शिवसेनेचे उमेदवार असलेल्या बारणेंच्या यंत्रणेला हे कळून चुकले आहे की, युतीतील घटक पक्ष अजितदादांची राष्ट्रवादी आणि भाजप आपल्या प्रचारात मनापासून सक्रिय होत नाहीत. त्यामुळे त्यांनी मावळ लोकसभा मतदारसंघात  भाजपच्या केंद्रीय समितीच्या रूपाने “हाकामारी” मतदारसंघात फिरत असल्याची आवई उठवली आहे. आता ही हाकामारी समस्त घटक पक्षातील नेत्या, कार्यकर्त्यांच्या घरावर फुली मारील आणि मग “त्यांचं काही खरं नाही”, अशी ही आवई उठवून घटक पक्षांच्या नेत्या, कार्यकर्त्यांच्या पायात साप सोडण्याचा हा प्रयत्न करण्यात आला असल्याची चर्चा आता मतदारसंघात आहे.

श्रीरंगअप्पा बारणेंचा आत्मविश्वास ढासळला काय?

अक्षरशः देव पाण्यात ठेऊन बाराणेंनी शिंदे गटाकडून लोकसभेची उमेदवारी तर मिळवली. मात्र, घटक पक्षातील भाजप आणि अजितदादांची राष्ट्रवादी यांचे नेते, कार्यकर्ते मतदारसंघात तितकेशे सक्रिय नाहीत हे वारंवार स्पष्ट झालेले आहे. अनेकदा अनेकांकडे तक्रारी करूनही परिस्थितीत फारसा बदल होत नाही, हे देखील बारणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे प्रसिद्धी आणि प्रसारमाध्यमांसह समाज माध्यमांमधून भाजपच्या केंद्रीय समितीची “हाकामारी” आली असल्याची आवई बारणेंच्या प्रसिद्धी यंत्रणेने उठवली आहे. आता ही हाकामारी कोणाकोणाच्या घरावर फुल्ल्या मारणार आणि नंतर त्यांना धडा शिकवणार यावर गंमतचर्चा या यंत्रणेने सुरू केली आहे. मतदारसंघात ही हाकामारीची आवई शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंगअप्पा बारणे यांना का उठवावी लावते हा खरा मूळ महत्त्वाचा प्रश्न आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात दोन कार्यकाळ म्हणजे दहा वर्षे श्रीरंगअप्पा बारणे खासदार आहेत. या दहा वर्षात त्यांनी सहयोगी पक्ष म्हणजे भाजप यांच्या स्थानिक नेत्या, कार्यकर्त्यांना कधीही आपल्या जवळ येऊ दिले नाही, एव्हढेच नव्हे तर, ज्या शिवसेनेच्या उमेदवरीवर ते दहा वर्षे खासदार आहेत, त्या शिवसेनेला देखील आपल्या पासून लांब ठेवले, असे संपूर्ण मतदारसंघात चर्चिले जात आहे. आतापर्यंत भाजपच्या जीवावर हा माणूस खासदार झाला, पण मावळच्या भाजपाई नेत्या, कार्यकर्त्यांना त्याचा कपर्दिकेचाही उपयोग झाला नाही, अशी मतदारसंघातील भाजपाईंची भावना आहे. शिवाय मूळ शिवसेनेचे दोन भाग झाल्यावरही बारणे स्वतः शिंदेंच्या शिवसेनेत असूनही तालुकानिहाय माणसे उभी करण्याचा कोणताही प्रयत्न बाराणेंनी गेल्या अडीच वर्षात केलेला नाही ही खरी परिस्थिती असल्याचे बोलले जात आहे. मग अशा व्यक्तीसाठी आम्ही स्वतःला शिणवुन का घ्यावे, अशी भावनाही शिंदे गट आणि भाजपाई नेत्या, कार्यकर्त्यांमध्ये आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघातील बारणे यांच्या समोर लढणारे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार संजोग भिकू वाघेरे पाटील हे पूर्वाश्रमीचे अजितदादा पवारांचे खांदे समर्थक असल्याचे उघड आहे. किंबहुना, ते अजितदादांचेच उमेदवार असल्याचे उघड गुपित मतदारसंघात सांगितले जाते. या सर्व पार्श्वभूमीवर बारणे यांना आपण निवडणुकीत विजयी होऊ किंवा कसे, याचा आत्मविश्वास राहिला नाही. म्हणूनच महायुतीतील सहयोगी पक्षांच्या नेत्या, कार्यकर्त्यांच्या पायात साप सोडण्याचा प्रयत्न बारणे यांच्याकडून केला जात आहे. त्यातूनच मग भाजपाई केंद्रीय समिती पाहणी करीत आहे अशी आवई श्रीरंगअप्पा बारणे यांच्या प्रसार यंत्रणेने उठवली आहे. मात्र, आपल्या माहितीप्रमाणे अशी कोणतीही समिती कार्यरत नसल्याचा निर्वाळा पिंपरी चिंचवड शहर भाजप अध्यक्ष शंकरराव जगताप यांनी दिला आहे. मग ही अशी हाकामारीची आवई का उठवली गेली असावी, यावर जनसामान्यांमध्ये चर्चा होत आहे.

आता खरोखरच अशी कोणती समिती भाजपाई शिर्षस्थ नेत्यांनी पाठविली आहे काय, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याही पुढे जाऊन या “हाकामारी”च्या आडून बारणे यांचीच यंत्रणा काही घरांवर फुल्ल्या मारते आहे काय, असाही प्रश्न महायुतीच्या सहयोगी पक्षातील नेते, कार्यकर्त्यांसह सामान्य जनही उपस्थित करीत आहेत. 

——————————————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×