आमची पोलीस चौकी चोरीला गेलीय, आयुक्त साहेब शोधून देतील काय?
पिंपरी (दि. २५/०३/२०२१ )
सुमारे पन्नास हजार लोकवस्ती असलेल्या कासारवाडीची पोलीस चौकी गायब झाली आहे. चोरीला गेली की कुठे पळून गेली माहिती नाही. गेली दीड वर्ष आम्ही या पोलीस चौकीला शोधतोय, सापडत नाही. कुठे तक्रार करायची? आमच्या तक्रारीची दाद कोणाकडे मागायची?आयर्न मॅन पोलीस आयुक्त कृष्णा प्रकाश आमची पोलीस चौकी शोधून देतील काय? अशी तक्रार कासारवाडीतील नागरिक सध्या करीत आहेत.
नागरिकांची ही तक्रार ऐकून आम्ही आमच्या परीने पोलीस चौकीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. या पोलीस चौकीचा जन्म नाशिक फाट्याच्या सिग्नलजवळ नाल्याच्या बाजूला रेल्वेलाईनला लागून असलेल्या एका जुनाट घरात झाला. जुन्या मुंबई पुणे मार्गाच्या रुंदीकरणात हे घर तोडून टाकण्यात आले. त्यानंतर कासारवाडीकरांची ही पोलीस चौकी सी. आय. आर. टी. च्या भिंतीलगत पिंपरी चिंचवड महापालिकेने बांधून दिलेल्या एका तात्पुरत्या बैठ्या इमारतीत वसवली गेली. नाशिक फाट्याच्या भोसरीकडे उतरणाऱ्या फ्लाय ओव्हरसाठी तिला पुन्हा विस्थापित व्हावे लागले. त्यावेळच्या भोसरी पी. आय. ने कासारवाडीच्या नागरिकांकडून सिमेंट, वाळू, स्टील, पैसे या पोलीस चौकीच्या इमारतीसाठी गोळा केले. ही इमारत सीएमइ च्या भिंतीलगत बी. जी. शिर्के कंपनीने बांधून दिली हा मुद्दा अलाहिदा!
या इमारतीत कासारवाडीकरांची पोलीस चौकी सुखाने नांदत असतानाच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या खंडणी विरोधी पथकाने पोलीस चौकीला देशोधडीला लावून त्या इमारतीत आपला संसार थाटला. तेव्हापासून कसारवाडीच्या प्रत्येक गरजेला धाऊन येणारी ही पोलीस चौकी गायब झाली. कासारवाडीचे नागरिक गेल्या दीड वर्षांपासून आपली गायब झालेली पोलीस चौकी शोधताहेत. कोणी पळवून नेली की चोरली गेली कळत नाही.
कासारवाडीचे सामाजिक कार्यकर्ते सतीश लांडगे या सर्व प्रकाराबाबत सांगतात की, आमचा कासारवाडीचा परिसर पिंपळे गुरवच्या नदीवरील पुलापासून सी एम इ च्या भिंतीपर्यंत आणि कुंदननगर पासून शंकरवाडीपर्यंत पसरलेला आहे. आमच्या पोलीस चौकीतून या परिसराचे कामकाज चालत होते. आता पोलीस चौकी नसल्याने आम्हाला भोसरी पोलीस ठाण्यात जावे लागते. एखादी घटना घडली तर कुठले पोलीस पाठवायचे यावर पोलिसांमध्येच वाद होतात. मग आम्हाला दाद काशी आणि केव्हा मिळणार? आम्हाला आमची हक्काची पोलीस चौकी हवी आहे.
या सगळ्या गोष्टींचा विचार केला असता नागरिकांना त्यांची पोलीस चौकी शोधून देऊन तिला पुन्हा सुखाने नांदू देण्याची सोय करणे महत्त्वाचे आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त ही तक्रार दूर करतील अशी आशा आहे.