सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींना अग्निशस्त्र कशाला हवे?

प्रसन्न चिंचवडे या एकविशीतल्या तरुणाचं निधन मनाला चटका देऊन गेलं. बागडायच्या ऐन उमेदीत हा तरुण कुटुंबाच्या, आप्तांच्या, मित्रांच्या आणि अगदीच अनोळखी असलेल्या, पण संवेदनशील व्यक्तीच्या डोळ्यात पाणी आणि हृदयाला धक्का देऊन अनंतात विलीन झाला. काय झालं असेल, कसं झालं असेल हा प्रश्न आहेच. त्याहीपेक्षा महत्वाचा प्रश्न उभा राहतो तो हे अग्निशस्त्र त्याच्या हाताला कसं लागलं हा! या तरुणाचे वडिल शेखर चिंचवडे सामाजिक कार्यकर्ते आहेत. शिवाय त्यांचा रोख रकमेच्या देवाणघेवाणीचाही व्यवसाय आहे. या तरुणाची आई नगरसेविका आहे. थोडक्यात या कुटुंबाला सामाजिक वलय आहे. तरीही यांच्याकडे अग्निशस्त्राचा परवाना आहे आणि अर्थातच अग्निशस्त्रही आहे. याच अग्निशस्त्राचा वापर करून प्रसन्न आपली इहलोकीची यात्रा संपविला झाला.

आता प्रश्न निर्माण होतो तो सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींना अग्निशस्त्र वापरायची गरज का भासते? तशी गरज या कुटुंबाला असेलही, मग आपल्याकडील अग्निशस्त्र आपण सुरक्षित का ठेवत नाही? कच्च्या बुद्धीच्या तरुणाला सापडेल असे आपले अग्निशस्त्र आपण कसे ठेवू शकतो? हे तीनही प्रश्न अनेक उपप्रश्न निर्माण करतात. मात्र या तीनही  प्रश्नांवर चर्चा व्हायला हवी. त्याचबरोबर अग्निशस्त्रांचे परवाने मिळण्याची पद्धतही एकदा तपासून पाहायला हवी. या घटनेच्या निमित्ताने हे फार आवश्यक आहे. ही चर्चा करताना चिंचवडे कुटुंबीयांचं मन  दुखावण्याचा कोणताही हेतू नाही, तसे  असंवेदनशील आम्ही नक्कीच नाही. पण चर्चा व्हायला हवी हे नक्की!

सर्वप्रथम सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना अग्निशस्त्र वापरण्याची गरज काय हा प्रश्न. जर तुम्ही सार्वजनिक जीवनात काही वेगळे करीत नसाल तर तुम्हाला भीती वाटण्याचे काही कारणंच नाही, समाजच तुमचं संरक्षण करण्यासाठी सिद्ध असतो, कारण समाजाला तुमची गरज असते. मग तुमच्यावर येणारं संकट समाज आपल्यावर घेतो, याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. मात्र आजमितीला अग्निशस्त्र वापरणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचं पेव फुटलेलं पाहायला मिळतं. असं का होतं, तर हे अग्निशस्त्र बाळगणारे तथाकथित सामाजिक कार्यकर्ते खरे कार्यकर्ते नसतातंच. केवळ जवळ पैसा आहे, चार तरुण सांभाळण्याची ताकद आणि हौस आहे, लोकांना भीती दाखवण्याची आणि आपला अहंकार कुरवाळायची सवय आहे, म्हणून सद्यस्थितीत काही मंडळी अनेक उलाढाली करून अग्निशस्त्राचे परवाने मिळवितात. हा दिखावा करून स्वयंघोषित नेते होण्याची घाई अनेकांना झाली आहे. शिवाय अग्निशस्त्र कंबरेला दिसेल असे लटकावून फिरण्यात या मंडळींना अघोरी आनंद मिळतो. यावर कोणीतरी, कोठेतरी नियंत्रण आणणे आवश्यक आहे.

आता दुसरा प्रश्न, हलगर्जीपणाचा! आपल्याकडे अग्निशस्त्र आहे, म्हणजे एक फार मोठी जबाबदारी आहे, याचा काही मंडळी विचारच करीत नाहीत. उलट त्याचा दिखाऊपणाचा सोसच जास्त असतो. अग्निशस्त्राची सुरक्षितता ही मंडळी वाऱ्यावर सोडतात. एखाद्या व्यक्तीच्या हाती आपले अग्निशस्त्र लागू न देणे ही सर्वस्वी परवानाधारकाची जबाबदारी असली पाहिजे. या शस्त्राचा गैरवापर होऊ शकतो याची फिकीर नसलेल्या मंडळींवर कारवाईचा बडगा उगारला गेला पाहिजे.

याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे असे परवाने देताना संबंधित यंत्रणेने परवाना मागण्याच्या कारणांची शहानिशा करून सखोल पडताळणी करणे गरजेचे आहे. कोणीतरी, कोणाचातरी, हितसंबंधी, नको त्या कारणांनी अग्निशस्त्र परवाना मागत असेल, तर त्यावर चाप बसला पाहिजे. त्याचबरोबर संबंधित यंत्रणेने आतापर्यंत दिलेले अग्निशस्त्र परवान्याची पुनःपडताळणी करणे गरजेचे आहे.

प्रसन्नच्या निमित्ताने एव्हढे झाले तरी फार झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×