शहरवासीयांनो सावधान! सुरू होत आहे, भाजपची पारंपरिक गोबेल्स नीती!

एडॉल्फ हिटलरने १९३९साली जर्मनीची सत्ता काबीज केल्यावर आपला प्रचार आणि प्रसार मंत्री म्हणून जोसेफ गोबेल्स या पत्रकार आणि संपादकाला नियुक्त केले. हिटलरची हुकूमशाही, दडपशाही, दमनशाही लोकांसमोर येऊ नये आणि त्याची लोकप्रियता वाढावी म्हणून या जोसेफ गोबेल्सने एक रणनीती तयार केली होती. या पद्धतीला जगात गोबेल्सची प्रचारनीती म्हणून संबोधले जाते. सांप्रतच्या काळी याच गोबेल्स नीतीचा वापर करून भारतीय जनता पक्ष अर्थात भाजपने आपली प्रचारनीती बनवली आहे. आता पिंपरी चिंचवड शहरातही या गोबेल्सनीतीचा वापर शहर भाजपकडून सुरू करण्यात आला आहे. वस्तुस्थिती ऐवजी भावनाप्रधान भाषेचा वापर करणे, कोणत्याही प्रश्नाचे समर्पक उत्तर देण्याऐवजी मोघम आणि सवंग पर्याय शोधणे, आमच्याशिवाय दुसरे कोणीच सक्षम नाही असे कानठळ्या बसेपर्यंत ओरडून सांगणे, भपकेदार सादरीकरण अशी गोबेल्सनीती आता पिंपरी चिंचवड शहरात वापरण्यास शहर भाजप आणि त्यांचे स्थानिक नेते, माजी आजी शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मणभाऊ जगताप आणि महेशदादा लांडगे सरसावले आहेत.

शहराच्या मूळ प्रश्नांना बगल देऊन ज्याचा या शहराशी काहीही संबंध नाही अशा बाबींवर शहरवासीयांना भुलवत ठेवण्याची गोबेल्सनीती शहर भाजपचे नेते आता अवलंबित आहेत. जे प्रत्यक्षात येणे शक्य नाही असे ठराव मंजूर करून शहरवासीयांना मूर्खात जमा करण्याचा कार्यक्रम शहर भाजपने आखला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सत्ताधारी भाजपने पिंपरी चिंचवड महापालिकेत मंजूर केलेले ठराव गोबेल्सनीतीचाच भाग असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. कामगार, कष्टकऱ्यांना दिलासा निधी, प्राधिकरण बाधित अनधिकृत बांधकामे अधिकृत करणे, शहराच्या कोविड लस खरेदीसाठी उगाचच आंतरराष्ट्रीय निविदा मागवणे असे अशक्य कोटीतील विषय मंजूर करून शहरवासीयांना गाजर दाखवायचे आणि मूळ प्रश्न अडगळीत टाकायचा ही नीती आता शहर भाजपकडून वापरली जात आहे.

महापालिकेत सध्या संडास धुण्यापासून जलशुद्धीकरण प्रकल्पापर्यंत प्रत्येक ठेक्यात आपली माणसे घुसवून भाजपने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. ऐन कोरोना काळात अंदाधुंद खरेदी करून त्यात आपल्या बगलबच्च्यांना मलिदा मिळवून देण्यासाठी महापालिकेची यंत्रणा वापरणे, इतर कोणी या खरेदीत अगर ठेक्यात घुसलेच तर त्यांना बदनाम करणे, वर आम्हीच शहराचे तारणहार म्हणून टेंभा मिरवणे असे हडेलहप्पी प्रकार आपल्या सत्ताकाळात भाजपने राजरोस चालविला आहे. आपल्या भ्रष्ट कारभाराची अनेक प्रकरणे दडपून टाकण्याचा प्रयत्न भाजपच्या शहर नेतृत्वाने गेल्या साडेचार वर्षात अगदी इमानदारीत केला आहे. यापैकी सर्वात मोठे प्रकरण म्हणजे ठेकेदारांनी महापालिकेत खोट्या मुदातठेवी आणि हामीपत्र जमा करून मिळवलेले ठेके. काही थातूरमातूर आणि तोंडदेखली कारवाई करून हे प्रकरण गुंडाळण्यात आले. या प्रकरणात दोषी ठरू शकणारे आपले बगलबच्चे अलगद वाचवण्यासाठी भाजपने हा खटाटोप केला. शहराचे वाटे घालून वाट लावण्याचा कार्यक्रम शहर भाजपच्या नेत्यांनी ठरवून चालवला आहे.

लोकांना दाखवण्यासाठी एकमेकांच्या विरोधात असल्याचे चित्र उभे करून शहर भाजपच्या माजी आजी शहराध्यक्ष आमदारांनी शहरवासीयांना गोंधळात ठेवले आहे. शहरवासीयांचा गोंधळ तसाच कायम ठेवून या आमदारांनी शहराचे वाटे घालून आपले सवतेसुभे उभे केले आहेत. आपल्या सुभ्याचे आपण मालक या अविर्भावात शहराचे वाटप करणारे हे आमदार एकत्रितपणे शहराचे वाटोळे करीत आहेत. खाजगीत एकमेकांचे उद्धार करणारे हे आमदार द्वयी, आपापल्या बगलबच्च्यांना आणि हितसंबंधितांना शहराच्या बोकांडी बसवण्याचा कार्यक्रम मात्र एकत्रितपणे करीत आहेत. आपला हा कारभार शहरवासीयांच्या लक्षात येऊ नये म्हणून मग गोबेल्सनीती वापरून हे दोनही आमदार शहराचे शोषण करीत आहेत. त्यासाठी प्रत्यक्षात न उतरणारे लोकानुनयी निर्णय घेऊन शहराला मूर्ख बनवण्याचा कार्यक्रम आक्रमकरित्या आमलात आणण्याचा मार्ग या भाजपच्या माजी आजी शहाराध्यक्षांनी अवलंबला आहे.

सामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचे अनेक प्रश्न पिंपरी चिंचवड शहरात प्रलंबित आहेत. अनेक प्रयत्न करूनही चोवीस तास पुरेसा पाणीपुरवठा करण्यास महापालिका अक्षम ठरली आहे. अगदी नव्याने तयार केलेले डांबरी आणि सिमेंट रस्ते पुन्हा उकरण्यात पिंपरी चिंचवड महापालिकेचा कोणीही हात धरू शकत नाही. कोण कशासाठी कोणता रास्ता खोदतो आहे, हे साक्षात परमेश्वरालाही सांगता येणे कठीण झाले आहे. शहराचे दोन भाग करून कचरा वाहतुकीचे काम घेतलेले ठेकेदार मुजोर आणि मग्रूर झाले आहेत. कचरा संकलनासाठी शहराचे आठ भाग करायचे की चार की दोन यामध्ये अडकून कचऱ्याचे ढीग हलेनासे झाले आहेत. पर्यावरणाचा सद्यस्थिती अहवाल चावून चावून चोथा झाला आहे. कोरोना महामारीमुळे सामान्यांच्या हाता तोंडाच्या लढाईतील जोर संपत चालला आहे. अनेक छोटे व्यावसायिक देशोधडीला लागले आहेत. ग्राहक क्रयशक्ती कमी झाल्यामुळे व्यापारी घायकुतीला आले आहेत. ऑनलाइन शिक्षणाचा बोजवारा उडाल्याने अनेक कच्चीबच्ची उनाडक्या करीत पालकांना सळो की पळो करून सोडताहेत. वाढलेल्या बेरोजगारीमुळे तरुण व्यसनाधीन आणि गुन्हेगार बनू लागला आहे. शहर सावरणारे आणि अराजकता आवरणारे कोणीही नाही. आशा परिस्थितीत पिंपरी चिंचवड शहरावर सध्या सत्ता काबीज केलेले आणि पुढच्या महापालिका निवडणुकीतही सत्ता अबाधित राखण्याचे मनसुभे रचणारे भाजपचे कर्तुमअकर्तुम नेते असलेले शहरातील दोनहि आमदार मात्र शहरावर गोबेल्सनीती अवलंबण्याचे काम करीत आहेत.

भाजपच्या शहरातील या करभाऱ्यांपैकी हिटलर कोण आणि गोबेल्स कोण हे शोधण्यात बळ खर्ची घालणे गैरवाजवी आहे. ते काम ज्याचे त्याने कारावे हा उद्देश ठेऊन शहरवासीयांना भाजपच्या गोबेल्सनीतीची ओळख व्हावी हा उद्देश आहे. अर्थात झोपलेल्या अगर झोपेचे सोंग घेतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आदी पक्षांचे विरोधक या पिंपरी चिंचवड शहरवासीयांसाठी काही करतील अशी बिलकुल आशा नाही. त्यामुळे आता शहरवासीयांनीच स्वतः शहाणे व्हावे, हे गरजेचे. भाजपची ही गोबेल्सनीती ध्यानात घेऊन हिटलरही काळाच्या पडद्याआड गेला ही आठवण शहर भाजप आणि त्यांचे स्थानिक नेते यांना करून दिली पाहिजे. हे हिटलर आणि गोबेल्स शहराच्या मानगुटीवर पकड घट्ट करण्यापूर्वीच त्यांचे मानगूट घरून त्यांना दूर करण्यासाठी आता पिंपरी चिंचवड शहरवासीयांनी आता सरसावले पाहिजे.                       ———————————————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×