संघ आणि भाजप देशात जातीय अराजकता निर्माण करताहेत काय?

राजकारण कायम समाजकारणाच्या अनुषंगाने केले जावे असा अलिखित दंडक आहे. मात्र, भारतीय जनता पक्ष आणि त्यांची मातृसंस्था असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना राजकारण आणि सत्ता केवळ स्वाधिष्ठित वापरायची असते, हे उघड गुपित आहे. आज समाजातील प्रत्येक घटक, प्रत्येक स्तर असंतुष्ट आहे. कोणालाच समाधानी राहू द्यायचे नाही, मात्र, समाधान मिळवून देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे ढोंग करायचे हा भाजप, संघ आणि त्यांच्या कच्छपी असलेल्या बगलबच्च्यांचा सध्या खेळ सुरू आहे. प्रत्येक जात वर्गाला पेटवून द्यायचे आणि एकमेकांविरोधी शड्डू ठोकायला मजबूर करायचे, हा सत्ताधारी भाजप आणि त्यांच्या डाव्याउजव्यांचा कायमचा उपद्व्याप झाला आहे. महाराष्ट्रात आणि देशात धार्मिक उन्माद निर्माण करून जाती जातीत फूट पडली जाते आहे. बहुजन ताकद विभाजित करून या सत्ताधाऱ्यांनी स्वतःचे उखळ पांढरे करण्याचा उद्योग राजरोसपणे चालविला आहे.

जातीय आरक्षणाचे गाजर आणि त्यातून निर्माण होणारी अराजकता.

सांप्रतला मराठा समाज पेटवला गेला आहे. मनोज जरांगे नावाचा अचानक उद्भवलेला अगर उद्भवू घातलेला मराठा नेता समाज जगावतो आहे. या जागे झालेल्या समाजाला पेटविण्याचे काम सत्ताधारी भाजप आणि त्यांचे बगलबच्चे अनेक क्र्लुपत्या वापरून करताहेत. मराठ्यांना आरक्षण हवे, तेही इतर मागासवर्ग प्रवर्गातूनच. मग इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी, आपल्या मुळात अर्ध्याच असलेल्या भाकरीत वाटेकरी वाढतो आहे, या भीतीने ग्रासतो आहे, किंबहुना तसा ग्रासवला जातो आहे. धनगर समाज आपला समावेश अनुसूचित जातीत व्हावा म्हणून प्रयत्नरत आहे. अनुचुचित जातींची अ, ब, क, ड अशी वर्गवारी करण्याचा विचार उघडपणे प्रकट केला जातो आहे. मुस्लिम समाजाला देखील आरक्षण हवे आहे. थोडक्यात काय, तर या महाराष्ट्रात प्रत्येक समाज घटक उगाच जागृत झाल्याचा आव आणतो आहे. मात्र, महाराष्ट्रातील भाजप आणि त्यांच्या कच्छपी लागलेल्यांचे सरकार प्रत्येक समाज  घटकाला गम्मत म्हणून खेळवते आहे.

आरक्षण देणार कसे आणि घेणार कसे? 

आरक्षण मागणारा प्रत्येक समाज घटक नोकऱ्या आणि शिक्षण यांसाठी आरक्षण हवे म्हणून टाहो फोडतो आहे. राजकीय आरक्षण आपोआपच मिळेल हे सर्वांनाच माहिती आहे. मुळात या मंडळींना राजकीय आरक्षणच हवे आहे. मात्र, नोकऱ्या आणि शिक्षण म्हटले की, सगळेच कसे गोजिरवाणे वाटते, म्हणून नोकऱ्या, शिक्षणाचा आग्रह धरला जातो आहे. पण मुळात नोकऱ्या आणि शिक्षण आरक्षणाच्या मर्यादेत आहे काय, याचा विचार कोणीच करीत नाही. मोठ्या प्रमाणात शासकीय आणि निमशासकीय उद्योग उद्योगपतींच्या घशात घातले जात आहेत. राज्याच्या एकूणच धोरणांमुळे आणि राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे अनेक उद्योग राज्याबाहेर जाताना दिसताहेत. शासकीय नोकऱ्या आता खाजगी संस्थांच्या माध्यमातून तात्पुरत्या भरल्या जाताहेत.

काही मोजक्या उद्योगपतींनी या देशाचे शैक्षणिक धोरण ठरविले आहे. शिक्षणाचा उद्योग करण्याचा त्यांचा विचार या धोरणांमध्ये स्पष्ट दृष्गोचार होतो आहे. अनेक शासकीय शाळा शासन बंद करते आहे, अगर खाजगी उद्योगपतींच्या घशात जाण्याच्या मार्गावर आहेत. उच्च शिक्षणात तर अनेक उद्योगपती आणि शिक्षण सम्राटांची मक्तेदारी अगोदरच स्थापित झाली आहे. मग आता आरक्षण मिळवून हे भांडणारे समस्त समाज घटक काय साधणार आहेत, हे अध्याहृत आहे. आरक्षण मिळाले तरी त्याचा लाभ कोण आणि कसा घेणार हा खरा प्रश्न आहे. शासकीय निमशासकीय नोकऱ्या नाहीत, उच्च शिक्षण आणि प्राथमिक शिक्षण खाजगी संस्था आणि उद्योगपतींना आंदण देण्यात येते आहे. 

भाजप आणि संघ समाजात अराजकता निर्माण करतो आहे काय?

सरकारच्याच म्हणजे भाजप आणि त्यांच्या डाव्याउजव्यांच्या धोरणांमुळे शासकीय निमशासकीय नोकऱ्या आणि शिक्षण जर शिल्लकच राहणार नसेल, तर मग आरक्षण मिळणार कसे, याचा विचार कोणीच करताना दिसत नाही. मग हे सर्व भांडण नक्की कशासाठी आणि कोण करतय, हा खरा प्रश्न आहे. सरकार आणि सरकारचे प्रतिनिधी आरक्षण या विषयावर वेगवेगळी वक्तव्ये अजूनही सातत्याने करीत आहेत. “आम्ही टिकणारे आरक्षण देऊ, कोणी न्यायालयीन भानगडी निर्माण केल्याच तर, ते आरक्षण टिकले पाहिजे.” हा सरकारचा किंबहुना, भाजपचा घोष आहे. मग भाजपनेच कोणीतरी न्यायालयीन भानगडी उपस्थित करेल, अशी सोया केली आहे काय असाही प्रश्न निर्माण होतो. मग हे सगळे अवडंबर केवळ सर्वच समाजघटकांमध्ये अराजकता निर्माण करून त्याचा राजकीय लाभ घेण्याचा हा संघी आणि भाजपाई प्रयत्न तर नाही ना?

आता शहाणे झाले पाहिजे!

प्रत्येक समाजाला एकमेकांविरुद्ध लढविण्याचा हा सरकारी प्रयत्न हाणून पडला पाहिजे. आरक्षण मिळाले तरी ते वापरण्यासाठी सरकारी नोकऱ्या आणि उच्च / प्राथमिक शिक्षण संस्था शाबूत राहाव्यात म्हणून प्रयत्न करायला हवेत. बहुजन समाज शहाणा अगर संपन्न होऊच नये हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाचा उद्देश हणून पडला पाहिजे.

आज एक जानेवारी! इंग्रजी दिनादर्शिकेनुसार नवीन वर्षाची सुरुवात! त्याच बरोबर आजचा दिवस समस्त आणखी एक कारणासाठी तितकाच महत्त्वपूर्ण आहे. दोनशे सहा वर्षांपूर्वी आजच्या दिवशी भीमा कोरेगाव च्या शिवारात पाचशे महार, तीनशे दोन बहुजन, सहा मुसलमान आणि सव्वीस इंग्रज या सर्वांनी मिळून एक अभूतपूर्व पराक्रम केला. कर्मठ, सनातनी, मनुवादी ब्राह्मणी राजवटीला म्हणजेच पेशवाईला नेस्तनाबूत केले होते. हा समस्त बहुजनांनी मनुवादावर मिळविलेला विजय होता. त्या विजयाच्या स्मरणार्थ तेथे असलेल्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय तेथे लोटला आहे. म्हणूनच आजच्या दिवशी एक नवी सुरुवात करून शासकीय अराजकता निर्माण करू इच्छिणाऱ्यांना थोपविले पाहिजे. आता हा संकल्प करायचा की नाही, हे प्रत्येक बहुजनांच्या स्वतःच ठरविले पाहिजे.

——————————————————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×