भाजपने निगडी उड्डाणपूल लवकर चालू केला नाही, तर जबरदस्तीने करावा लागेल! -राजू मिसाळ

पिंपरी  (दि. १८/०६/२०२१)

काम जवळपास पूर्ण होऊनही निगडीच्या भक्तीशक्ती चौकातील उड्डाणपूल सत्ताधारी भाजपने वाहतुकीस खुला करण्याचे थांबविले आहे. त्यामुळे निगडी प्राधिकरणात राहणाऱ्या नागरिकांना आणि मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या वाहनांना काही किलोमीटर अंतराचा प्रवास घडून नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. हा उड्डाणपूल सत्ताधारी भाजपने लवकरात लवकर खुला केला नाही तर, नाईलाजाने तो जबरदस्तीने देखील खुला करण्यात येईल, असे खुले आव्हान सत्ताधाऱ्यांना पिंपरी चिंचवड महापलिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आणि विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी ‘नवनायक’ शी बोलताना दिले आहे.

नागरिकांचा त्रास वाचविण्यासाठी कायदा हातात घ्यावा लागला तरी चालेल, असे सांगून विरोधी पक्षनेते राजू मिसाळ म्हणाले की, हा उड्डाणपूल पूर्ण करण्याचा विहित कालावधी संपून जमाना झाला आहे. भाजपच्या राज्य आणि केंद्र पातळीवरच्या नेत्यांना वेळ नाही म्हणून पुलाचे उद्घाटन सत्ताधाऱ्यांनी रोखून धरले आहे. शहराच्या प्रवेशद्वारावर असलेला हा पूल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या कल्पकतेतून आणि मार्गदर्शनातून उभा राहिला आहे. आमच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून या उड्डाणपूलाचे महत्त्व आहे. गेल्या महिनाभरपूर्वीच पुलाचे काम संपले आहे. मात्र, महापालिका प्रशासनाला हाताशी धरून मुद्दाम काही किरकोळ काम शिल्लक ठेवले असून पूल पूर्ण झाला नसल्याचे दृश्य भाजपचे पदाधिकारी निर्माण करीत आहेत.

पुलाच्या कामामुळे वाहतूक लांबून वळवण्यात आली आहे. मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या वाहनांचा त्यामुळे गोंधळ उडून अनेकदा ही वाहने भरकटतात आणि आयतीच वाहतूक पोलिसांच्या जाळ्यात अडकतात. त्यात वेळेचा अपव्यय होतोच, शिवाय दंडाचा भुर्दंडही सोसावा लागतो आहे. प्राधिकरण आणि परिसरातील नागरिकांना तर, नाहक काही किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. केवळ नेत्यांना वेळ नाही म्हणून नागरिकांच्या वेळेची नासाडी भाजपच्या स्थानिक पुढाऱ्यांकडून केली जात आहे. त्यामुळे हा पूल लवकरात लवकर वाहतुकीस खुला केला नाही, तर कायदा मोडून तो खुला करण्याशिवाय पर्याय नाही, अशी माहितीही विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी दिली.

पिंपरी चिंचवड शहराचे नाक असलेल्या या उड्डाणपुलाचे उद्घाटन संगणकीय पध्दतीने ना होता प्रत्यक्षात व्हावे आणि या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांना सन्मानपूर्वक निमंत्रित करावे, असा आमचा आग्रह असल्याचे सांगून महापलिकेतील विरोधी पक्षनेते राजू मिसाळ पुढे म्हणाले की, हा शहरातील एक अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन सुद्धा दिमाखदार पद्धतीने व्हावे. “मोरीला बोळा आणि दरवाजा उघडाच” अशा प्रकारची काटकसर करून मर्तिकाच्या चिट्ठीप्रमाणे असलेल्या निमंत्रण पत्रिका सत्ताधारी भाजपच्या काळात मान्यवरांना पाठविल्या जातात. अनेक प्रकारे भ्रष्टाचाराचा मलिदा खाऊनही पोट न भरलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दात कोरून पोट भरण्याचा उपद्व्याप न करता निमंत्रण पत्रिकेचे नियोजन करावे. उड्डाणपुलाचे उद्घाटन व्यवस्थित आणि लवकरात लवकर व्हावे, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहराच्या महापौर माई ढोरे यांच्याकडे पत्र देऊन केली आहे. हा पूल नजीकच्या काळात वाहतुकीस खुला झाला नाही तर, आम्हाला तो करावा लागेल, असेही राजू मिसाळ यांनी शेवटी ठासून सांगितले.
—————————————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×