आदित्य बिर्लावाले डॉक्टर नाहीत, व्यापारी आहेत!
पिंपरी (दि.२०/०५/२०२१)
आदित्य बिर्ला रुग्णालयात डॉक्टर नाही व्यापारी आहेत. कोविडग्रस्त रुग्णांना त्यांच्याएव्हढे कोणीच छळले नसेल. अव्वाच्यासव्वा बिल आकारणी, रुग्ण वाचण्याची कोणतीही शाश्वती नाही, रुग्ण व्यवस्थापनात अक्षम्य ढिलाई, यामुळे हे रुग्णालय बदनाम झाले आहे. या रुग्णालयावर कारवाई झाली पाहिजे, म्हणून भारतीय वैद्यक परिषद अर्थात मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया कडे आणि रुग्णालयाला परवानगी देणाऱ्या स्थानिक यंत्रणेकडे तक्रार दाखल करून त्या तक्रारीचा पाठपुरावा करणार असल्याचे खासदार श्रीरंगअप्पा बारणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाच्या एकंदर परिस्थितीवर आपले बारकाईने लक्ष असून खाजगी कोविड सेंटर बद्दल फारच तक्रारी असल्याचे कबूल करून थेरगाव येथील आदित्य बिर्ला रुग्णालयाच्या बाबतीत कोणीही चांगले बोलत नाही, असेही खासदार बारणे यांनी पत्रकारांना सांगितले.
पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या पुणे प्रादेशिक विकास महामंडळातील विलीनीकरणाबाबत राज्य शासनाला दिलेल्या निवेदनाची माहिती देण्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंगअप्पा बारणे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. कोरोनामुळे शहरात निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावाही त्यांनी यावेळी घेतला. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याचे सांगून बारणे यांनी याबाबत पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांशी चर्चा केल्याचे सांगितले. कोविडग्रस्त रुग्णांवर उपचार करणाऱ्या खाजगी रूग्णालयांवर विशेष लक्ष असल्याचे स्पष्ट करून आदित्य बिर्ला रुग्णालयाच्या तक्रारिंचा पाढाच बारणे यांनी वाचून दाखवला. शहरातील खाजगी रुग्णालयांमध्ये सगळ्यात ज्यास्त मृत्युदर आदित्य बिर्ला रुग्णालयाचा असल्याची माहिती त्यांनी दिली.
रूग्णालयाचे बिल भरले नाही म्हणून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी न देण्याचा प्रकार आदित्य बिर्ला सह अनेक रुग्णालयात होत असल्याची माहितीही खासदार बारणे यांनी पत्रकारांना दिली. तळेगाव दाभाडे येथील मायमर रुग्णालयातील अशा प्रकारावर जिल्हाधिकाऱ्यांकरवी कारवाई करण्यासाठी बारणे यांनी विशेष लक्ष दिले होते. रुग्णाची आत्महत्या आणि मृतदेह डांबून ठेवण्याच्या प्रकारानंतर मायमर रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाची चौकशी शासकीय यंत्रणेमार्फत आता सुरू करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड शहरातील कोविडग्रस्त रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांवर चौकशीचे सत्र लावणे गरजेचे आहे. या रुग्णालयांच्या बिलाचे लेखापरीक्षण करून सुमारे पंधरा कोटी रुपयांची ज्यादाची बिले असल्याचा अहवाल पिंपरी चिंचवड महापालिकेच्या लेखापरीक्षण विभागाने वैद्यकीय विभागाला दिला आहे. मात्र, वैद्यकीय विभागाने हा अहवाल दाबून ठेवला असून त्यावर कारवाई होताना दिसत नाही.
खासदार श्रीरंगअप्पा बारणे यांनी हा अहवाल खुला करण्याचा प्रयत्न करावा. या अहवालातून अनेक खाजगी रुग्णालयांच्या अनेक भानगडी बाहेर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचबरोबर हा अहवाल बाहेर आला तर ज्यादाची बिले घेणाऱ्या रूग्णालयांवर कारवाई करता येईल आणि सामान्यजनांची जी लूटमार या रुग्णालयांनी केली, तेही उघड होईल. शिवाय ज्यादाची भरलेली रक्कम वसूल करून रुग्ण अगर त्यांच्या नातेवाईकांना परत देत येईल आणि रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना काहीसा दिलासा मिळेल. खासदार बारणे यांनी ज्यादाची बिले घेणाऱ्या या रूग्णालयांवर कारवाई होण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहरातही नागरिकांकडून होत आहे.
–––––––––––––––––––––––––––