काळ्या बुरशीपेक्षा अँफोटेरिसीन इंजेक्शनचा तगादा त्रासदायक!

पिंपरी (दि.२२/०५/२०२१)
रेमडीसीविरची शोधाशोध करून थकलेल्या कोविडग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना आता अँफोटेरिसीन हे नवे इंजेक्शन शोधताना फेस आला आहे. कोविड मधून बरे झालेल्या रुग्णांना आता काळी बुरशी म्हणजे म्युकरमायकोसिस ने गाठले आहे. या काळ्या बुरशीवर अँफोटेरिसीन हे एकमेव औषध आहे. कोविड होऊन गेलेल्या रुग्णाला इतर कोणताही त्रास झाल्यास खाजगी रुग्णालये सर्रास काळ्या बुरशीची भीती रुग्णांना दाखवीत असल्याचे निदर्शनात आले आहे. या काळ्या बुरशीवर एकमेव उपाय असलेले अँफोटेरिसीन हे इंजेक्शन रुग्णाच्या वाजनाप्रमाणे रोज पाच ते सात अशी किमान सात दिवस आणि त्यानंतर डोस कमी करून जवळपास महिनाभर द्यावे लागते. या इंजेक्शनचा साठा अत्यंत मर्यादित स्वरूपात उपलब्ध असल्याने ते शोधताना लोकांच्या तोंडाला फेस आला आहे.
काळी बुरशी म्हणजेच म्युकरमायकोसिस हा आजार कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांना होतो असे म्हटले जाते. पिंपरी चिंचवड शहरातील नामांकित नाक, कान, घसा तज्ज्ञ डॉ. अरविंद पाटील म्युकरमायकोसिस म्हणजे काळी बुरशी आणि अँस्परजिलोसिस म्हणजे पांढरी बुरशी यावर माहिती देताना सांगतात की, कोविड होऊन गेलेल्या आणि मधुमेह असलेल्या रुग्णांना या बुरशीची लागण पटकन होण्याची शक्यता आहे. फुफ्फुस, नाक, कान, घसा आणि नंतर मेंदूपर्यंत ही बुरशी पसरते. अगदी सुरुवातीला हे लक्षात आले तरच काळ्या बुरशीवर अँफोटेरिसीन या इंजेक्शनचा तर ऍस्परजिलोसिस या पांढऱ्या बुरशीवर पोस्याकॉनॉझोल किंवा व्होरिकॉनॉझोल औषधाचा उपयोग होतो. मात्र, बुरशीमुळे खराब झालेला भाग काढून टाकणे अत्यंत आवश्यक असते. शात्रक्रिया करून हा दूषित भाग काढून टाकला नाही तर इंजेक्शनचा उपयोग होणार नाही. अर्थात अगदी सुरुवात झाली असेल तरच केवळ इंजेक्शन देऊन रुग्ण बरा होऊ शकतो.
सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे अँफोटेरिसीन हे इंजेक्शनची एक व्हायल सुमारे पाच हजार रुपयांना मिळते. रोज पाच ते सात आणि नंतर एक किंवा दोन महिनाभर रोज असे हे इंजेक्शन घ्यावे लागते. म्हणजे पाहिले सात दिवस रोज पंचवीस हजार रुपये हा काळ्या बुरशीवर करण्यात येणाऱ्या इलाजाचा किमान खर्च आहे. तोच प्रकार पांढऱ्या बुरशीचा आहे. यासाठी लागणाऱ्या औषधाचा खर्चही रोज सुमारे वीस हजार रुपये इतका आहे. सर्वसामान्य रुग्णांना न परवडणारा हा खर्च असल्याने पिंपरी चिंचवड महापालिकेने कोविड पश्चात होणाऱ्या या बुरशीची लागण झालेल्या रुग्णांसाठी वाय सी एम रुग्णालयात स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. त्याचप्रमाणे यासाठी लागणाऱ्या औषधांच्या वाटपांचे नियोजन जिल्हाधिकारी स्वतः करीत आहेत.
मात्र, रेमडीसीविरप्रमाणेच आता अँफोटेरिसीन इंजेक्शनसाठी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना तगादा लावून पळापळ करण्यास खाजगी रुग्णालये भाग पाडत आहेत. असतील तिथून आणि असतील तेव्हढे अँफोटेरिसीन इंजेक्शन गोळा करण्यासाठी भाग पडणाऱ्या या खाजगी रुग्णालयांना थांबवणे अतिआवश्यक झाले आहे. तसाही आता अँफोटेरिसीन इंजेक्शनचा काळा बाजार सुरू होण्यास वेळ लागणार नाही. करण या इंजेक्शनचे वितरण शासकीय पातळीवर होत असल्याने बाहेर हे इंजेक्शन मिळणे दुरापास्त होत आहे. हा सगळा प्रकार वेळीच रोखणे गरजेचे आहे. प्रशासकीय पातळीवर आणि पोलीस यंत्रणेतून अँफोटेरिसीन इंजेक्शनबाबत गैरप्रकार होणार नाहीत याची काळजी घेतली जावी, अशी अपेक्षा समान्यजनांकडून व्यक्त होत आहे.
——————————————————-