मांडवडहाळे! रूढी परंपरा, शक्तिप्रदर्शन, संपत्तीचा दिखावा, की आणखी काही?

मांडवडहाळे, एक नियमित रूढी परंपरा! कोणत्याही मुलीच्या लगीनघरी होणारा एक नियमित, पारंपरिक सोहळा! तसा तो भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांच्याही घरी गेल्या आठवड्यात झाला. या पारंपरिक सोहळ्यात एखाद्या मुलीचा बाप जेव्हढा काळजीत तरीही आनंदात असतो तेव्हढाच आनंद आमदार लांडगेंनाही झाला. फरक एव्हढाच की हा आनंद द्विगुणित करण्यासाठी जे आणि जेव्हढे एखादा बाप करतो, त्यापेक्षा थोडेसे जास्त आमदार महेशदादा लांडगेंनी केले. आमदार आणि त्यातल्या त्यात पहिलवान असूनही महेशदादा आपल्या मुलीच्या मांडवडहाळ्याच्या मिरवणुकीत नाचले. एकटेच नाचले असे नाही तर आप्त, इष्ट, मित्र, भाऊ, भाऊबंद आणि काही प्रशासकीय कर्मचाऱ्यांसह काहिशेंची गर्दी गोळा करून नाचले. काही छिद्रानवेशी नतद्रष्टांनी मात्र, या आनंदात मिठाचा खडा टाकून काहिशेंची गर्दी आमदार लांडगेंनी गोळा करून कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढविला म्हणून बोंब ठोकली. आमदार लांडगे या मिरवणुकीत कसे नाचले याच्या दृक्श्राव्य चित्रफिती सामाजिक आणि इतर प्रसार माध्यमे यांनी सर्वदूर पासरवल्या.

कोरोना महामारीत कमीतकमी लोकांनी एकत्र यावे, असे एकत्र येताना शारीरिक अंतर पाळावे, तोंडाला मुखपट्टी बांधावी, सतत हस्तप्रक्षालन करावे असे नियम घालून देण्यात आले आहेत. महामारीचा संसर्ग टाळण्यासाठी हे सगळे करणे गरजेचे आहे, हे मान्य! पण आमदार लांडगेंना आपल्या कन्येच्या विवाहाच्या आनंदाचा जो संसर्ग झाला आणि त्या संसर्गाचा त्यांच्या आप्त, इष्ट, मित्र, भाऊ, भाऊबंद, प्रशासकीय मंडळी यांनाही संसर्ग झाला, त्याचे काय? महामारीच्या संसर्गाच्या भितीने या सर्व मंडळींनी आपला आनंदाचा संसर्ग का रोखून धरायचा हा खरा प्रश्न आहे. महामारीचे निमित्त करून आमदार महेशदादा लांडगे आणि त्यांच्या आनंदाने संसर्गित झालेल्या लोकांना कायद्याचा डोस देऊन तो संसर्गजन्य आनंद थोपविता येणार नाही हे या पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेला माहीत नाही काय? पण आमदार महेशदादा आणि त्यांच्या संसर्गित संबंधितांनी कायद्याचा सन्मान म्हणून महामारीतील नियमांचे पालन शक्य झाले नाही, हे कबुल केले. त्यातही पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेचा कदृपणा किती? अवघ्या पन्नास साठ लोकांवर गुन्हे दाखल करून तिथे सहभागी झालेल्या काहीशे लोकांवर या यंत्रणेने अन्याय केला आहे. आमदारांच्या आनंदाचा संसर्ग फक्त पन्नास साठ लोकांनाच कसा होऊ शकतो, याचा विचार गुन्हे दाखल करताना पोलिसांनी का केला नाही? खरे म्हणजे पोलिसांनी या मिरवणुकीत कोणकोण सहभागी होते, असे जाहीर आवाहन केले असते, तर तिथे उपस्थित असलेल्या आणि नसलेल्याही अनेकांनी आमदारांच्या आनंदाने संसर्गित झाल्याचा शिक्का आपल्यावर मारून घेण्यासाठी स्वतःवर गुन्हे नोंदवून घेतले असते.

मांडवडहाळे ही एक परंपरा आहे. काही शतके प्रचलित असलेल्या या परंपरेचा काही विशिष्ठ हेतू आहे. मुलीच्या लग्नामुळे आनंदित झालेल्या बापाच्या आनंदात सहभागी होण्याचा, त्या बापाच्या आप्तेष्टांचा एक मार्ग म्हणून या प्रथेकडे पाहिले जाते. त्याच बरोबर त्या बापाच्या काही अडचणी सोडवण्याचा प्रयत्नही या निमित्ताने केला जातो. कोणत्याही मुलीचे लग्न कोणत्याही अडचणींशीवाय व्हावे, यासाठी आपल्यापरीने त्या बापाचे आप्तेष्ट त्याला मदत करतात. ही मदत तो बाप आणि त्याचे आप्तेष्ट यांच्यातच राहावी म्हणून लगीनघरी मांडवडहाळ्यांच्या आडून ती मदत त्या बापाला पोहोचविण्याचा एक मार्ग म्हणून ही रूढी परंपरा पाळली जाते. तो बापही या मदतीची नोंद ठेवून त्या आप्तेष्टाच्या घरातील मुलीच्या लग्नात आपला सहभाग नोंदवण्यासाठी मांडवडहाळ्याच्या आडून परतफेड करीत असतो.

आता इथे आमदार महेशदादा लांडगे यांच्या मुलीच्या लग्नाला काही मदत करण्याची औकात कोणी दाखवणे म्हणजे जरा अतीच आहे. त्यामुळे तिथे येऊन केवळ आमदारांच्या आनंदाने संसर्गित व्हायचे आणि भंडाऱ्यात पिवळे व्हायचे, एव्हढेच अपेक्षित होते. शिवाय पिवळे झाल्यानंतर लाल, काळे होण्याची सोय उपलब्ध असल्याने आनंदाचा संसर्ग अनेकगुणीत करण्याची संधीही होती. म्हणून मग आपली उपस्थिती दाखविण्याच्या सोसापायी केवळ महामारीची मर्यादा सांभाळण्यासाठी फक्त काहीशे लोकांनी आपला सहभाग नोंदवला. त्या निमित्ताने आमदारांच्या आनंदाचा संसर्ग होण्यासाठी अगदी महामारीची भीती असतानाही एव्हढे लोक जमा झाले आणि एक वेगळे शक्तीप्रदर्शन झाले याचे खरे म्हणजे कोणत्याही यंत्रणेने कौतुकच करायला हवे. पण नतद्रष्ट यंत्रणेने यावर गुन्हे दाखल करावेत, हे अगदी काहीतरीच. त्यातही फक्त पन्नास साठ लोकांवर गुन्हे दाखल करण्याचा कदृपणा दाखवून या यंत्रणेने आमदार महेशदादांच्या आनंदाच्या संसर्गाचा अपमान केला आहे.

खरे म्हणजे केवळ आणि केवळ महामारीचा आणि त्यासाठीच्या कायद्यांचा विचार करून आमदार महेशदादा लांडगे यांनी आपल्या मुलीचा लग्नसोहळा कितीतरी सीमित करून आपल्या आनंदाच्या संसर्गावर मेहनतीने ताबा मिळवला आहे. हे महामारीचे वातावरण नसते, तर? पिंपरी चिंचवड शहरातील फक्त काही गुंठ्यांचे धनी असलेल्या वतनदार, दरकदारांचे लग्नसोहळे कसे दिमाखदार होतात याची माहिती घेतली तर लक्षात येईल. मांडवडहाळ्याचेच उदाहरण घेतले तरी, सुमारे पंधरा लाख आणि त्यावरच्या किमती असलेल्या पन्नास साठ गाड्याच मिरवणुकीत असतात, माणसे वेगळीच. या शहरातल्या मूळ मालकांच्या लग्नसोहळ्यात उठणाऱ्या पंगती, मिरवणारे लोक, श्रीमंतीचा बडेजाव, शक्तिप्रदर्शन, व्यक्तिप्रदर्शन, या सगळ्यांचा विचार केला तर, या शहराचे मूळ मालक असलेल्या आणि आमदारही असलेल्या महेशदादांनी स्वतःला किती आणि कशी मुरड घातली, याचा सारासार विचार व्हावा. आपल्यामुळे आपल्या आनंदाच्या संसर्गाने वेडावलेल्या लोकांना त्रास नको ही भावना मनी धरूनच त्यांनी संपूर्ण संयमाने हा प्रसंग वाटे लावला. उगाचच विरोधकांच्या हातात कोलीत नको म्हणून आणि त्या कोलिताचा वापर महामारीतून उसंत मिळाली तर, होऊ शकणाऱ्या आगामी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत करता येऊ नये म्हणून आमदार महेशदादांनी असीम त्याग केला आहे. सहा दिवसानंतर होण्याचे निश्चित असतानाही केवळ लोकापवाद नको म्हणून त्यांनी आपल्या कन्येचा विवाह अत्यंत साध्या पद्धतीने संतश्रेष्ठ ज्ञानोबारायांच्या बंद मंदिरासमोर केला. अर्थात, या सगळ्या प्रकारात आमदार महेशदादा लांडगे यांच्या कन्येचा हिरमोड झाला असेल, हा भाग अलाहिदा! कोरोना महामारी नसती तर हा लग्नसोहळा कसा दैदिप्यमान वगैरे झाला असता, याचा विचार त्या कन्येचा मनात आला असल्यास वावगे ठरू नये. त्याहीपुढे जाऊन आपला पिता आमदार असल्यामुळेच असलेले लोकापवादाचे भय नसते तर, आपल्या पहिलवान पित्याने महामारी आणि त्याच्या कायद्यांचा विचार केला असता काय? असाही विचार कदाचित त्या कन्येच्या मनात डोकावला असल्यास, तेही वावगे ठरू नये! लोक काय काहीतरी बोलतच असतात, मात्र या सगळ्या चर्चेच्या पलिकडे जाऊन त्या कन्येच्या आणि तिच्या बापाच्या मानसिकतेचा विचार व्हावा, याच अपेक्षेने हा एव्हढा लेखनप्रपंच!

———————————————————-

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×