संतपीठ आणि सीबीएसई शिक्षण पद्धती, हा बादरायण संबंध थांबवा!

संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या सानिध्याने पावन झालेल्या भूमीवर संतपीठ उभारावे या हेतूने चिखलीचे भूमिपुत्र आणि दिवंगत नगरसेवक दत्ताकाका साने यांनी अथक प्रयत्न केले. दुर्दैवाने त्यांच्या हयातीत चिखलीच्या ग्रामस्थांना अभिमान वाटावा असा हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही. मात्र आता या संतपीठाच्या मूळ कल्पनेलाच सुरुंग लावणारा निर्णय घेऊन दत्ताकाका साने यांच्याच नव्हे, तर संतशिरोमणी ज्ञानोबा माऊली आणि तुकोबाराय यांच्याही स्मृतीस यातना पोहोचविण्याचा प्रयत्न पिंपरी चिंचवड महापलिकेतील सत्ताधारी भाजपने आणि त्यांच्या कच्छपी लागलेल्या महापालिका प्रशासनाने केला आहे. चिखली येथील या सुरू होणाऱ्या संतपीठात माध्यमिक शिक्षणाच्या केंद्रीय मंडळाचा म्हणजेच सीबीएसई पद्धतीचा अभ्यासक्रम लावून आणि त्यासाठी पंधरा हजार रुपये वार्षिक शैक्षणिक शुल्क लावून पिंपरी चिंचवड महापालिका नक्की काय करू इच्छिते हे अनाकलनीय आहे. सर्वसामान्यजनांना खोट्या रुढीपरंपरांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी आपली हयात घालवलेल्या संतशिरोमणी तुकोबारायांच्या नावाने असलेल्या या संतपीठात संतांची समाजकारणाची शिकवण द्यायची की आंग्लभाषेतील गैरलागू शिक्षणपद्धती शिकवायची याची अक्कल नसलेले लोक खरे म्हणजे या संतपीठातून खड्यासारखे बाजूला काढले पाहिजेत. दिवंगत दत्ताकाका साने यांच्या प्रयत्नातून आकाराला आलेल्या या संतपीठाच्या आयत्या बिळावर कुंडली मारून बसलेल्या या वारकरी समाजासाठी विषारी असलेल्या नागांना वेळीच ठेचले पाहिजे.

“टाळगाव चिखली” असे नामाभिधान लाभलेल्या चिखलीगावाबद्दल अख्यायिका आहे की, संतशिरोमणी तुकोबाराय सदेह वैकुंठास जाताना त्यांच्या हातातील टाळ या गावात पडले होते. म्हणून या चिखलीला टाळगाव चिखली असे नाव पडले आहे. संतसानिध्य लाभलेल्या या गावात संतपीठ उभे राहावे आणि वारकरी संप्रदायाची मांदियाळी व्हावी या उद्देशाने दिवंगत दत्ताकाका साने यांनी आग्रहपूर्वक प्रयत्न केले. मार्च २०१७ मध्ये महापालिकेत भाजपची सत्ता आल्यावर भोसरीच्या भाजपाईंनी संतपीठाच्या या प्रकल्पावर आपला कब्जा स्थापित केला. संतपीठ उभारतानाची मूळ कल्पना महाराष्ट्रातील संतपरंपरा आणि त्यातील समाजकारण याचा अभ्यास व्हावा अशी होती. संतांच्या विचारांचा आदर्श समाज निर्माण व्हावा म्हणून पहिली ते बारावी अशी निवासी शाळा आणि शक्य झालेच तर पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करता यावे अशी सोय या संतपीठात करण्याचा मानस ठेवण्यात आला होता. मात्र महापलिकेतील सत्ताधारी भाजपने आणि विशेषतः भाजपच्या शहराध्यक्ष आमदारांनी या पूर्ण प्रकल्पाचा बोजवारा उडवला आहे.

महाराष्ट्रातील सर्वच संतांनी डोळस भक्तीचा पाठ या मातीत रुजवला आहे. अंधानुकरण अगर अंधभक्ती न करता आपल्या विठुमाऊलीला देखील खडसावून प्रश्न विचारण्याची हिम्मत ठेवणारी संत आणि वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. या परंपरेतून डोळस आणि समाजहीतकारक पिढी घडविण्यासाठी या संतपीठाचा उपयोग होईल हा या संतपीठाच्या मूळ गाभा होता. संतवाङ्मयाचा सखोल आणि सर्वंकष अभ्यास आणि त्या अनुषंगाने संशोधन होणे या संतपीठाद्वारे अभिप्रेत होते. सगळ्यात विशेष म्हणजे या महाराष्ट्रातील यच्चयावत संत साहित्य संस्कृत, अर्धमागधी, प्राकृत आणि मराठी या भाषांमध्ये आहे. मग या संतपीठात सीबीएसई पद्धतीची इंग्रजी शाळा सुरू करून संतपीठाच्या मूळ हेतुलाच सुरुंग लावण्याचे पाप का केले जात असावे हे अनाकलनीय आहे. संत वाङ्मय आणि सीबीएसई अभ्यासक्रम यांची सांगड घालण्याचा हा चमत्कारिक, गैरलागू आणि ढालगज प्रकार का करण्यात आला असावा याचे संशोधन होणे गरजेचे आहे.

त्यातही आता वार्षिक पंधरा हजार रुपये शैक्षणिक शुल्क आकारले जाणार आहे. इतर शैक्षणिक साहित्य, गणवेश आणि अनुषांगिक बाबींचा विचार करता प्रत्येक विद्यार्थ्याला अजून सुमारे वीस हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत. या वेडगळ प्रकाराला कोणी आडवे येऊ नये म्हणून या संतपीठासाठी वेगळे संचालक आणि नियामक मंडळ तयार करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक प्रा. डॉ. सदानंद मोरे, आळंदी देवस्थानचे विश्वस्त आणि प्रसिद्ध अर्थतज्ञ प्रा. अभय टिळक, ह.भ.प. राजू महाराज ढोरे आणि शिक्षणतज्ञ स्वाती मुळ्ये हे या संचालक आणि नियामक मंडळाचे संचालक आणि सल्लागार आहेत. या सर्व जाणकार आणि तज्ज्ञांना मोडीत काढून संतपीठाच्या मूळ हेतुलाच हरताळ फसण्याचा कार्यक्रम पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपने आपल्या मनमानीने चालविला आहे.

वस्तुतः पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सुमारे साडेचार एकर जमिनीवर उभारण्यात येत आलेल्या या संतपीठाचे बांधकाम अजून साठ टक्क्यांपेक्षा जास्त बाकी आहे. या प्रकल्पाची इमारत तळमजला अधिक तीन मजले अशी असून, यात ४८ वर्गखोल्या, ३ कार्यालये, ७ प्रयोगशाळा,२ संगणक कक्ष, २ सभागृहे, संगीत आणि वाद्य कक्ष यांसह विस्तीर्ण मैदान अशी तजवीज करण्यात आली आहे. सध्या इमारतीचा सांगडा उभारण्याचे काम चालू असून डिसेंबर२०२१ नंतर आतील बांधकाम सुरू होणे अपेक्षित आहे. कोणत्याही परिस्थितीत जुलै २०२२ पूर्वी इमारत पूर्ण होणे अशक्य आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात या जागेतील पूर्वीच्या तीन खोल्यांची डागडुज्जी करून तिथे येत्या १४ जुलै रोजी शाळा सुरू करण्याचा घाट शहर भाजपने घातला आहे. संपूर्ण इमारत प्रकल्प अपूर्ण असतानाही शाळा सुरू करण्यामागे केवळ श्रेय्य लाटण्याचा प्रकार आणि आपल्या नावाची पाटी लावण्याची घाई एव्हढेच कारण सध्यातरी दिसून येत आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या फेब्रुवारी २०२२ मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीनंतर आपली सत्ता नसणार याची खात्री बहुदा भाजपचे शहराध्यक्ष असलेल्या भोसरीच्या आमदारांना पटली असावी. त्यामुळे लवकरात लवकर संत तुकाराम यांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या चिखलीस्थित संतपिठाचे उद्घाटन करून आपले नाव लावण्याची घाई शहर भाजपाईंना झाली आहे. मात्र, या अनावश्यक घाईमुळे आपण संतपीठ या संकल्पनेलाच तिलांजली देत आहोत, याचा विचार हे संतपीठ चालविण्यासाठी नेमलेल्या नियामक आणि संचालक मंडळाला का शिवला नसावा यावरच आभ्यास होणे गरजेचे आहे. संतपीठाची मूळ संकल्पना मांडणारे दिवंगत दत्ताकाका साने आज हयात असते, तर हा प्रकार थांबविण्यासाठी त्यांनी प्रखर विरोध केला असता. दत्ताकाका ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक नेते होते, त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मात्र संतपीठाचा दुरुपयोग करून तिथे काही वेगळेच करण्याचा घाट घालणाऱ्या पिंपरी चिंचवड महापलिकेतील सत्ताधारी भाजपला रोखण्याचा ठाम प्रयत्न केल्याचे दिसून येत नाही. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी आयुक्तांना केवळ पत्र देऊन आपली इतिकर्तव्यता केली आहे.

हा सर्व प्रकार रोखण्यासाठी ज्यांनी प्रयत्नपूर्वक काम करायला हवे, ते मूग गिळून आहेत. त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे ज्या तथाकथित तज्ज्ञ मंडळींकडे या संतपीठाची धुरा सोपवण्यात आली आहे, त्यांनीही आश्चर्यकारक रित्या तोंडात गुळणी धरून ठेवली आहे. आता संतपीठाच्या मूळ हेतुलाच सुरुंग लावणारा पिंपरी चिंचवड महापलिकेतील सत्ताधारी भाजपचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी परिसरातील वारकरी संप्रदायाच्या मंडळींनी आणि चिखली ग्रामस्थांनी जागरूकतेने प्रयत्न करणे आवश्यक आहे. तूर्तास साहित्याची जण असलेले पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी संतपीठ आणि सीबीएसई शिक्षण यांचा बादरायण संबंध जोडणाऱ्या शहर भाजपाईंना रोखले पाहिजे. की या अनावश्यक घाईला आयुक्तांचीही संमती आहे, हेही स्पष्ट होणे आवश्यक आहे.                                                ————————————————————

Leave a Reply

Your email address will not be published.

×