२०५, २०६, २०७! एक घाबरवतात, एक घाबरतात, तिसरे काहीच करीत नाहीत!

लोकप्रतिनिधी शहर घडवतात, नावलौकिकास आणतात, शहरवासीयांना आधार आणि दिलासा देतात, असे वस्तुतः असायला हवे. पण पिंपरी चिंचवड शहर त्याबाबतीत नशिबाने कदृ ठरले आहे. या शहरात तीन विधानसभा मतदारसंघ आहेत, २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघ, २०६ पिंपरी विधानसभा मतदारसंघ आणि २०७ भोसरी विधानसभा मतदारसंघ. सुमारे तीस लाख लोकसंख्या असलेले हे शहर सर्वार्थाने या २०५, २०६, २०७ मध्ये विभागले गेले आहे. २०५ आणि २०७ सध्या भारतीय जनता पक्षाच्या आणि २०६ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या अखत्यारीत आहे. शहराला तीन आमदार लाभले असतानाही या शहराच्या नागरिकांना भय आणि भ्रष्टाचार मुक्त जीवन जगणे दुरापास्त आहे. यातील एक आमदार शहरवासीयांना इतके घाबरवताहेत की, शहरवासी हवालदिल आहेत. दुसरे आमदार इतके घाबरताहेत की शहरात त्यांची उपस्थिती पत्रकांखेरीज कोठेही दिसत नाही. तिसरे आमदार त्यांच्याच वर्तुळात इतके मश्गुल आहेत की, कोठे दिसतच नाहीत.

गेली दीड वर्षे शहरात कोरोना महामारीचा चढउतार चालू आहे. मार्च २०२० पासून आजतागायत नऊ दहा महिने टाळेबंदी आणि संचारबंदीमुळे शहरातील सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आली आहे. कष्टकरी, कामगार, रोजंदारीवरील मजूर, टपरी, पथारीवाले यांच्यापासून कारखानदारांपर्यंत सर्वच व्यावसायिक त्रासले आहेत. त्यातल्या त्यात पिंपरी चिंचवड महापालिकेने शक्य त्या सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न करून शहरवासीयांचे धाडस वाढविले आहे. आतापर्यंत सुमारे सव्वापंधरा लाख नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत, तर सुमारे दोन लाख एकसष्ट हजार कोविडग्रस्त रुग्णांवर उपचार केले आहेत. दुर्दैवाने त्रेचाळीसशे पेक्षा जास्त रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. या सर्व त्रासदायक परिस्थितीत रोजगार आणि व्यवसाय धोक्यात आलेले सामान्य शहरवासी हतबल झाले आहेत. एव्हढे होऊनही पुन्हा कोरोना महामारीची तिसरी लाट येण्याच्या शक्यतेने बिचकलेले शहरवासी आताशी या विदारक परिस्थितीतही आपले रोजचे जगणे जगत आहेत.

अशा परिस्थितीत शहरवासीयांना घाबरवण्याचे काम २०७ चे आमदार आणि शहर भाजपचे आजी शहराध्यक्ष गेली काही दिवस सातत्याने करीत आले आहेत. कोरोना महामारीच्या अगदी मध्यावर किंवा कोरोना आपला पूर्ण जलवा दाखवत असतानाच अचानकपणे या आमदारांना स्वतःच हतबल झाल्याची भावना निर्माण झाली. ही भावना केवळ स्वतःपुर्ती मर्यादित न राखता आपली हतबलता त्यांनी समाज माध्यमांद्वारे जाहीरही करून टाकली. थोडक्यात आता माझ्या हातबलतेचा विचार करून कोणी माझ्यावर अवलंबून राहू नका, माझा तुम्हाला काहीच उपयोग नाही, मला आपला धंदापाणी बघू द्या, असा स्पष्ट संदेश त्यांनी शहरवासीयांना देऊन टाकला. आपली आमदारकीची कारकीर्द केवळ आपल्या बगलबच्च्यांना आणि हितसंबंधितांना पोसण्यासाठीच आहे, इतर शहरवासीयांशी आता आपला काही संबंध नाही, हे सांगण्याचा त्यांचा हा प्रयत्न तुम्ही तुमचं बघा, अशा आशयाचा होता. ज्या मतदारांच्या भरवशावर यांची सर्व मदार आहे, त्या मतदारांनाच बेभरवशाच्या परिस्थितीत लोटून काढता पाय घेणारे हे आमदार मग शहरवासीयांना घाबरवत आहेत असे म्हणण्यास प्रत्यवाय नसावा.

दुसरे २०५ चे भाजपचे माजी शहराध्यक्ष असलेले आमदार तर या शहरातील जनतेशी आपले काही देणेघेणेच नाही असे स्वतःला अलिप्त ठेऊन आहेत. त्यांच्या पंचवीस एकर जमिनीवरच्या बंगल्याव्यतिरिक्त मतदारसंघात दुसरे काहीच नाही असा जणू त्यांचा समज झाला असावा काय, असे वाटावे इतपत अलिप्तता हे महोदय पाळून आहेत. आपल्या कार्यालयातून वेगवेगळी पत्रके प्रसिद्ध करण्याइतपतच त्यांची आमदारकी शिल्लक राहिली आहे, असे आता शहरवासीयांनाही वाटू लागले आहे. पिंपरी चिंचवड शहरातील आम जनता अगर ज्यांना मतदार म्हणून संबोधता येईल अशी बापूडवाणी “अनफिट” लोकं केवळ या महोदयांना घोड्यावर आणि सायकलीवर रपेट मारून स्वतःला “फिट” राखण्याच्या कार्यक्रमात मग्न असल्याच्या छायाचित्रातच भेटत आली आहे. थोडक्यात काय तर, कोरोना महामारीत जनतेपासून अलिप्तता राखणारे हे महोदय घाबरले आहेत काय याचा संभ्रम आम मतदारांमध्ये निर्माण व्हावा इतपत क्वारंटाईन झाले आहेत अगर त्यांनी तसे स्वतःला करून घेतले आहे.

हे २०५ आणि २०७ चे दोनही आमदार पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. त्यामुळे या दोघांचेही छुपे समर्थक आजही राष्ट्रवादीमध्ये आहेतच. या दोघांच्या कर्तुमअकर्तुम नेतृत्वानेच पिंपरी चिंचवड महापालिकेत पंधरा वर्षे सलग सत्ता भोगणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला २०१७ च्या महापालिका निवडणुकीत पायउतार व्हावे लागले आणि भारतीय जनता पक्षाची अर्थात भाजपची सत्ता प्रस्थापित झाली. या सत्ता परिवर्तनात एक तिसरा महत्त्वपूर्ण सहभागही आहेच, मात्र त्याबद्दल अलाहिदा विचारपूर्वक चर्चा करावी लागेल. भाजपच्या सत्तास्थापनेपासून हे भाजपचे अजिमाजी शहराध्यक्ष गेली साडेचार वर्षे शहरवासीयांना घाबरवत आणि घाबरण्याचे नाटक करीत आले आहेत. महापालिकेवर कब्जा मिळवल्यानंतर या दोन्ही आमदारांनी शहराची वाटणी करून शहरवासीयांना आपल्या धाकात आणि दमात ठेवले आहे. वाटून घेतलेल्या आपल्या हिश्श्यात आपणच प्रतिपरमेश्वर असा यांचा खाक्या आहे. आम नागरिकांनी आणि इतर पक्षियांनी आपल्या कारभारात ढवळाढवळ करू नये म्हणून मग हे भयाचे आणि त्यातून निर्माण झालेल्या भ्रष्टाचाराचे राजकारण या आमदार द्वयांनी बिनधास्तपणे चालविले आहे. सुरुवातीलाच हे दोनही आमदार आमच्यात विळाभोपळ्याचे सख्य असल्याचे चित्र निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत. एकमेकांवर कुरघोडी करण्याचे दृश्य राजकारण करणारे हे आमदार द्वय महापालिकेची तिजोरी रिकामी करण्यासाठी आणि आपल्या बगलबच्च्यांना मलिदा वाटण्यासाठी मात्र एकत्रच कार्यरत आहेत. ऐन कोरोना महामारीत देखील यांचे हे वाटप शाबूत राखण्यात हे दोनही आमदार यशस्वी झाले आहेत. या दोघांचेही काही छुपे समर्थक आणि हितसंबंधी राष्ट्रवादीसह इतर पक्षात असल्याने त्यांना कडवा विरोध कधी झालाच नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिका आपल्या बगलबच्च्यांमध्ये वाटण्याचा यांचा कार्यक्रम अगदी बिनघोरपणे आणि सर्रासपणे अव्याहत ठेवण्यात यांना यश मिळाले आहे.

पिंपरी चिंचवड शहराचे तिसरे २०६ चे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार तर आपणच निर्माण केलेल्या प्रश्नात आणि वर्तुळात इतके मश्गुल आहेत, की शहरात त्यांचे अस्तित्वच जाणवत नाही. महत्वाचे म्हणजे २०५ आणि २०७ च्या आमदारांनी शहर वाटून घेतल्यामुळे यांच्या हिश्श्याला काहीच शिल्लक राहिलेले नाही. अर्थात, या शहरात आपणही एक आमदार आहोत आणि आपलाही सहभाग या शहराच्या राजकारणात आहे, हे दर्शविण्याचा प्रयत्न त्यांनीही कधी ठामपणे आणि स्पष्टपणे केल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे त्यांनीच निर्माण केलेल्या त्यांच्याभोवतीच्या वर्तुळाव्यतिरिक्त त्यांची आमदारकी जनसामान्यांना दृश्गोचर झाल्याचा प्रत्यय येत नाही. २०६ हा पिंपरी विधानसभा मतदारसंघ नेमका २०५ आणि २०७ च्या मध्येच आहे. भौगोलिक दृष्ट्या शहराच्या मध्यभागी असलेल्या २०६ ला लौकीकदृष्ट्याही उर्वरित दोघांनी दाबून टाकले आहे अगर दाबून ठेवले आहे आणि महत्त्वाचे म्हणजे २०६ ने सुध्दा स्वतःला असे दाबून आणि दबून राखण्यात धन्यता मानली आहे. वस्तुतः शहरातील तिसरे कुठेच न दिसणारे आमदार महापलिकेतील विरोधी पक्षाचे म्हणजेच राष्ट्रवादी पक्षाचे आहेत. त्यांना आपले अस्तित्व ठळकपणे दाखवून देण्याच्या अनेक संधी हे डावेउजवे आमदार सातत्याने देत असतात. तरीही विरोधी पक्षाचे आमदार म्हणून २०६ प्रभावीपणे का कार्यरत नाहीत, हे आकलनाच्या कक्षेबाहेरचे आहे.

आता प्रश्न उरतो तो पिंपरी चिंचवड शहरवासीयांचा. खरे म्हणजे एक साफसुथरी प्रशासन व्यवस्था मिळणे आणि आपल्या रोजच्या साधनसुविधा बिनदिक्कतपणे उपलब्ध होणे, एव्हढीच माफक अपेक्षा कोणत्याही शहरवासीयांची, कोणत्याही शहर प्रशासनाकडून असते. शहरवासीयांची ही माफक अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी पूर्णतः त्यांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींची असते, त्यासाठीच तर सामान्य नागरिक आपला प्रतिनिधी निवडत असतो. मग या शहरातील २०५, २०६, २०७ चे लोकनियुक्त आमदार पिंपरी चिंचवड शहरवासीयांच्या माफक अपेक्षा पूर्ण करीत आहेत काय, यावर स्पष्ट चर्चा होणे गरजेचे आहे. त्याचबरोबरीने हे लोकप्रतिनिधी नागरिकांच्या माफक अपेक्षा पूर्ण करीत नसतील, तर त्यांच्यावर लक्ष आणि वचक ठेवण्याचे काम समाज माध्यमे आणि प्रसार माध्यमे यांचे असते. या शहरातील ही माध्यमे आपले हे निर्धारित काम करताहेत काय, यावर अलाहिदा संशोधन होणे आवश्यक आहे. सध्यातरी हे २०५, २०६, २०७ चे तारणहार आमदार यांच्याबाबत विचार करणे अगत्याचे आहे. भय आणि भ्रष्टाचार मुक्त सुलभ, सरल, सुघड आणि सुसह्य जीवनमान या शहरवासीयांना मिळावे म्हणून हे लोकप्रतिनिधी काम करताहेत काय हा सांप्रतचा मुख्य प्रश्न आहे. शहर वाटून घेणारे २०५ आणि २०७, यांच्या बेचक्यात असलेले २०६ यांच्याकडून शहरवासी मतदारांच्या माफक अपेक्षा आहेत, त्या ते कितपत पूर्ण करताहेत हे महत्त्वाचे. अजूनही भीतीचे सावट असलेल्या कोरोना महामारीच्या आपात्कालीन परिस्थितीत जनसामान्यांना खोटा दिलासा देण्याऐवजी त्यांच्यासाठी काही ठोस उपाययोजना करून पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनामार्फत त्या गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा कोणता कार्यक्रम या तीनही आमदारांकडे आहे, हा प्रश्न आता शहरवासीयांनीच विचारला पाहिजे.                                                      ———————————————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×