धर, ननावरे वाद नक्की कोणाच्या पथ्यावर आणि कोणाच्या सांगण्यावरून?

निवडणुका जसजशा जवळ येतील, तसतसे पिंपरी चिंचवड शहरातील वेगवेगळे वाद उफाळून येतील, असे चित्र सध्या निर्माण झाले आहे. हे राजकीय वाद नेहमीच बहुपेडी असतात.शिवाय दृश्य स्वरूपात हे वाद व्यक्ती, पक्ष, पक्षातील गट, संघटना यांच्यात उफाळले असले तरी, त्याचा फायदा कोणा दुसऱ्याच व्यक्ती, पक्ष, संघटनांना होत असतो. या राजकीय वादाची आग एका ठिकाणी, धग दुसऱ्या ठिकाणी, शेकतो कोणी तिसराच आणि पोळ्या कोणा चौथ्याच्याच भाजल्या जातात. असाच एक वाद काल सोमवार ९ऑगस्ट रोजी शहरात उफाळून आला. हा वाद संत तुकारामनगर मधील विद्यमान नगरसेविका सुलक्षणा धर आणि माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे, यांच्यात निर्माण झाला असला तरी या वादाची धग अगर ऊब नक्की कोणाला मिळणार, यावर शेकणार कोण आणि पोळ्या नक्की कोणाच्या भाजल्या जाणार, यावर शहरात जोरदार चर्चासत्रे झडू लागली आहेत.

सुलक्षणा धर आणि जितेंद्र ननावरे यांच्यातील वाद २०१७ मध्ये झालेल्या पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांचे फलित आहे. संत तुकारामनगर, अर्धी कासारवाडी, पिंपरी रेल्वे स्थानकापासून पुणे मुंबई रस्त्यापर्यंतचा परिसर अशा या प्रभागातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे योगेश बहल, शाम लांडे, सुलक्षणा धर आणि भाजपच्या सुजाता पलांडे निवडून आले आहेत. यांच्या विरोधात भाजप शिवसेना युतीतून कामगारनेते यशवंत भोसले, कुणाल लांडगे, जितेंद्र ननावरे यांच्या पत्नी प्रियांका ननावरे आणि राष्ट्रवादीच्या संगीता सुवर्णा यांना हार पत्करावी लागली. अनुसूचित जाती संवर्गातून निवडून आलेल्या सुलक्षणा धर यांनी जितेंद्र नानावरेंच्या पत्नीचा मोठ्या फरकाने पराभव केल्यापासून या दोघांमध्ये या ना त्या कारणावरून वाद उफाळत आहेत.

सुलक्षणा धर महापालिकेच्या लाभधारक आहेत काय?

सांप्रतला हा वाद नगरसेविका सुलक्षणा धर यांच्या पती आणि बंधूंच्या भागीदारीतील वैद्यकीय साहित्य पुरवठादार संस्थेने पिंपरी चिंचवड महापालिकेला कोरोना महामारी अत्युच्च पातळीवर असताना पुरवलेल्या मुखपट्टया या विषयावर सुरू आहे. सुलक्षणा यांचे पती आणि बंधूंच्या मालकीच्या पुरवठादार संस्थेने महापालिकेच्या निविदा प्रक्रियेत सहभागी होऊन, महापालिकेला एक लाख मुखपट्टया पुरवल्या आणि त्यापोटी मिळालेली रक्कम स्वीकारली. कोणताही नगरसदस्य त्या महापालिकेचा लाभधारक होऊ शकत नाही, या नियमानुसार पुणे महसूल विभागाच्या विभागिय आयुक्तांनी सुलक्षणा धर यांचे नगरसदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी करणारे पत्र, माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी विभागीय आयुक्तांना १० मार्च, २०२१ रोजी दिले. त्या पत्रावर विभागीय आयुक्त काहीच कारवाई करीत नाहीत म्हणून नानावरेंनी उच्च न्यायालयात धाव घेतली. या पत्रावर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने विभागीय आयुक्तांना द्यावेत अशी याचिका ननावरेंनी दाखल केली. यावर सुनावणी घेऊन उच्च न्यायालयाने जितेंद्र ननावरे यांच्या पत्रावर योग्य ती कारवाई करून त्यासंबंधीचा पूर्तता अहवाल आठ आठवड्यात द्यावा असे निर्देश देऊन याचिका खारीज केली. आता सुलक्षणा धर यांचे नगरसदस्यत्व रद्द होणार असा या उच्च न्यायालयाच्या निकालाचा सोयीस्कर अर्थ लावून तशा आशयाची माहिती जितेंद्र ननावरे यांनी पत्रकार परिषदेत प्रस्तुत केली आहे.

जितेंद्र ननावरे यांच्या पत्रकार परिषदेतील वक्तव्य निखालस खोटे आणि कुहेतूंचे असल्याचे सांगून सुलक्षणा धर यांनी, विभागीय आयुक्तांनी ननावरेंच्या पत्राची योग्य ती दखल घेऊन यापूर्वीच कारवाई केली असल्याची माहिती देणारे प्रसिद्धी पत्रक प्रस्तुत केले आहे. या दोनही आरोप प्रत्यारोपांची शहानिशा केली असता काही तथ्ये दृष्टीसमोर आली आहेत. या उजागर झालेल्या तथ्यांनुसार जितेंद्र ननावरेंच्या १०मार्च, २०२१ च्या पत्राची दखल घेऊन विभागीय आयुक्तांनी २६मार्च, २०२१ रोजीच्या पत्रानुसार, सदर बाब पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांच्या अखत्यारीतील असून, त्यांनी त्यावर योग्य ती कारवाई करावी आणि त्याची माहिती ननावरे यांना द्यावी, असे निर्देश दिले आहेत. विभागीय आयुक्तांच्या निर्देशानुसार पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांनी सुलक्षणा धर यांना २५जून २०२१रोजी कारणे दाखवा नोटीस बजावून आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली. त्यानुसार नगरसदस्या सुलक्षणा धर यांनी आपला खुलासा महापालिका आयुक्तांकडे १४जुलै २०२१ रोजी सादर केला आहे.

जितेंद्र ननावरे एव्हढे का पेटलेत?

जितेंद्र ननावरेंनी उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका, त्यांनी विभागीय आयुक्तांना १०मार्च २०२१ रोजी दिलेल्या पत्रावर कारवाई करण्यासाठी होती. वस्तुस्थिती दर्शक कागदपत्रांनुसार ही कारवाई केली गेली आहे. मग जितेंद्र ननावरेंनी उच्च न्यायालयात याचिका का दाखल केली, असा प्रश्न निर्माण होतो. परिसरातील काही जाणकारांच्या मते, सुलक्षणा धर या सुशिक्षित आणि सुसंस्कारित आहेत, त्यांना निवडणुकीत सरळ मात देणे दुरापास्त असल्याने, असे रडीचे डाव खेळून त्यांना महापालिका निवडणुकीच्या मैदानातून बाद करण्याचा हा प्रयत्न आहे. वस्तुतः पिंपरी चिंचवड महापलिकेच्या ज्या मुखपट्टी खरेदीवरून सुलक्षणा यांना पिडले जात आहे, त्या खरेदीच्या निविदा प्रक्रियेत सुलक्षणा धर यांच्या पती आणि बंधूंशी संबंधित पुरवठादार संस्थेने भागच घेतला नव्हता. मात्र, कोरोना महामारीच्या आपात्कालीन परिस्थितीत या संस्थेकडे असलेल्या मुखपट्टयांसाठी महापालिकेने स्वतःहून मागणी नोंदवली होती.कोरोना महामारीच्या काळात कोणतीही महापालिका आमसभा अगर विषयसमितीची बैठक झाली नाही. मग महापालिकेतील आपले सदस्यपद वापरून सुलक्षणा यांनी आपल्या बंधू आणि पतीच्या संस्थेला लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. अशा परिस्थितीत सुलक्षणा धर महापलिकेच्या लाभधारक कशा ठरू शकतात, हे अनाकलनीय आहे. केवळ येत्या पिंपरी चिंचवड महापलिकेच्या निवडणुकीत त्या जड जातील या भीतीपोटी जितेंद्र ननावरे हा भुई धोपटण्याचा कार्यक्रम करीत आहेत.

धर, ननावरे वाद नक्की का आणि कोणासाठी?

संत तुकारामनगर मधील गल्ली भाईंच्या पाठिंब्याने हा वाद निर्माण करण्यात आल्याची माहिती परिसरातील जाणकार सांगतात. या गल्ली भाईंनी आतापर्यंत संत तुकारामनगर परिसरात स्वयंभू व्यक्तिमत्व तयार होऊच दिले नाही. या भागात राजकारण अगर समाजकारण करायचे असेल, तर या गल्ली भाईंच्या हातचे कळसूत्री बाहुले बनून करायचे, असा खाक्या या गल्ली भाईंनी आतापर्यंत वापरला आहे. सुलक्षणा धर कळसूत्री बनत नाहीत, हे लक्षात आल्यामुळे हे गल्ली भाई पुरते पेटले आहेत. आपल्या गल्लीत आपणच शेर, बाकी सर्व भिगी बिल्ली, असा पायंडा ठेवलेल्या या गल्ली भाईंच्या अग्निजन्य हस्तक्षेपाने धर, ननावरे वादाची आग पेटली आहे. सुलक्षणा धर बाजूला निघाल्याशिवाय जितेंद्र ननावरेंची सद्दी येणार नाही, म्हणून ननावरेही पेटले आहेत.

येत्या पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत नव्याने प्रभाग रचना होणे अपेक्षित आहे. यावेळी इकडेतिकडे सरकायचे झाल्यास राष्ट्रवादीच्या एक प्रबळ दावेदार आड येतील आणि त्रास होईल, म्हणून काही भाजपाई देखील या वादाच्या आगीला फुंकर मारून अजून जाळ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. राजकीय वाद बहुपेडी असतातच, या वस्तुस्थितीनुसार वादाची आग विद्यमान नगरसेविका सुलक्षणा धर आणि माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांच्यात पेटली असली तरी, या आगीची धग अगर ऊब कोणाला लागणार आहे, त्या आगीवर कोण शेकून घेणार आहे आणि नक्की कोणाच्या पोळ्या भाजल्या जाणार आहेत, हे येत्या काही काळात स्पष्ट होईलच. तूर्तास सांप्रतला ही वादाची आग किती काळ आणि कशी धुमसत अगर उफाळत राहते, याकडे संत तुकारामनगर मधील आणि शहरातील जाणकार लक्ष ठेऊन आहेत.

————————————————–

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×