चला लक्ष्मणभाऊ, शहराला नको असलेली माणसं शोधू!

लक्ष्मणभाऊ जगताप म्हणतात, शहराला नको असलेली माणसं हटवा! खरे आहे, जी माणसं शहराला नको आहेत अगर ज्यांच्या असण्याने शहराला त्रासदी होणार आहे, अशी माणसं हटवलीच पाहिजेत. ज्यांच्यामुळे शहराचा नावलौकिक नासेल, ज्यांच्यामुळे शहरातील आम जनता अडचणीत येईल, ज्यांच्यामुळे महापालिका डबघाईला आली आहे अगर येणार आहे, ज्यांच्यामुळे शहर आणि महापालिका भ्रष्टाचाराची बजबजपुरी झाली आहे, ज्यांच्यामुळे सर्वच समाजघटकांत अनागोंदी आणि अराजकता माजली आहे, अशी माणसं या पिंपरी चिंचवड शहरातून आणि महापालिकेच्या कारभारातून हटवलीच पाहिजेत, किंबहुना आशा माणसांना शहरातून हद्दपारिच दिली पाहिजे. सहज बोलताबोलता, पिंपरी चिंचवड शहर भाजपचे माजी अध्यक्ष आणि चिंचवड विधानसभेचे आमदार, लक्ष्मणभाऊ जगताप यांनी अनौपचारिक चर्चेत शहरासाठी घातक ठरू शकणारी माणसं घालवा, अशी कळकळ व्यक्त केली. शहराच्या भल्यासाठी हे आवश्यक आहेच, त्याबाबत कोणाचेही, कधीही दुमत असणार नाही. मात्र, प्रश्न आहे तो, ही नको असलेली माणसं शोधायची कोणी आणि कशी. आता पिंपरी चिंचवड शहरवासी, आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांना, अशी माणसं मिळून शोधू असे म्हणताहेत, काय करायचे?

ही शहराला नको असलेली माणसं कशी शोधायची, यावर त्यांचे काय करायचे, हे सर्वस्वी अवलंबून आहे. सर्वप्रथम ही माणसं कोण आहेत, हे शोधणे महत्त्वाचे. त्याहीपेक्षा महत्त्वाचे आहे ते ही माणसे कोण आहेत, हे कोणाला माहीत आहे काय. बहुतेक सर्वसन्माननिय लक्ष्मणभाऊ जगताप यांना ही माणसे ठाऊक असावीत. पिंपरी चिंचवड शहरातील आपल्या पस्तीस वर्षांच्या कार्यकाळात, त्यातही मागच्या पंधरा वर्षात लक्ष्मणभाऊंनी हे शहर रीतसर आपल्या कह्यात राखण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रयत्न करताना अनेक चेलेचपाटे निर्माण केले आहेत. यातली किती आता शहराला नको असलेली झाली आहेत, हे आता दस्तुरखुद्द लक्ष्मणभाऊ जगतापच शहराला सांगू शकतील. त्यांनी तशी माणसे सांगितली, की त्या पद्धतीची इतर माणसे शोधणे शहरवासीयांना सहज सोपे होईल. मग, लक्ष्मणभाऊ, कधी देताय आपल्याकडची शहराला नको असलेल्या माणसांची यादी?

पिंपरी चिंचवड शहराची अस्मिता, गरिमा, सन्मान आणि समाधान स्वाहा करून, वर नाकाने या शहराला आपल्याशिवाय तरणोपाय नाही, अशी शेखी मिरवणारी, किती भस्मासूरी रूपे आपल्या स्वहस्ते आपणच निर्माण केली आहेत, हे पहिल्यांदा लक्ष्मणभाऊंनीच शहराला सांगावे. आपणही त्यांच्या स्वाहाकाराचे भागीदार अगर लाभधारक नाही, हे पहिल्यांदा आपल्यालाच स्पष्ट करावे लागेल. किंबहुना आपण हे स्वाहाकारी संमंध कसे निर्माण केले, हेही शहराला स्वयंस्पष्ट अहवाली पद्धतीने दाखवून द्यावे लागेल. मग, लक्ष्मणभाऊ, कधी करायची सुरुवात?

कुरघोड्यांचे आणि सुडाचे राजकारण करणे, हा या पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणाचा स्थायीभाव झाला आहे. एकमेकांच्या दुस्वासापोटी, एकमेकांच्या पायात सोडता यावेत म्हणून, अनेक साप या शहरात निर्माण केले गेले आहेत. आता या सापांनी स्वाहाकारी भुजंगांचे स्वरूप धारण केले आहे. सगळ्यात गदळ प्रकार म्हणजे, हे स्वाहाकारी भुजंग संपूर्ण शहराला विळख्यात घेऊन गरळ ओकताहेत. त्यांची ही गरळ, समाजव्यवस्था सडवण्यास कारणीभूत होते आहे. हे स्वाहाकारी भुजंग आणि त्यांचे निर्माणकर्ते, हे दोनही, समाजघातकच नव्हेत काय? हे भस्म्या झालेले स्वाहाकारी, गरळ ओकणारे भुजंग ठेचण्यास शहरवासी तयार आहेतच. घोडा मैदान जवळच आहे, येत्या पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या सर्पविनाशी यज्ञात हे सगळे छोटेमोठे साप आणि भुजंग आहुत करण्यास शहरातील मतदार तयारच आहेत. मग, या सर्पविनाशी यज्ञात पडणाऱ्या सर्पांना वाचवण्याचा कोणी प्रयत्न करू नये. पुराणकाळातील मिथकांप्रमाणे, कोणत्याही इंद्राच्या मागे, कोणताही तक्षक लपला, अगर कोणत्याही इंद्राने, कोणत्याही तक्षकाला लपविण्याचा प्रयत्न केला, तर या शहरातील सर्वसामान्य मतदार, प्रथमतः “इंद्राय स्वाहा” आणि त्यानंतर “तक्षकाय स्वाहा” म्हणतील, याबाबत कोणतेही दुमत असू नये.

या, लक्ष्मणभाऊ, आपण मिळुन समाजाला आणि शहराला घातक असलेले, समाजस्वास्थ्य बिघडवणारे, हे छोटेमोठे साप, भुजंग अलगद हटवू, किंबहुना ठेचु सुद्धा! 

मात्र, आता आपण कच खाऊ नये, इंद्र देखील होऊ नये. आपल्याकडे या सामाजघातकांची कोणती माहिती असल्यास अगर आपल्याकडे तशी कोणती यादी असल्यास ती उपलब्ध करून द्यावी. ही सगळी विषारी आणि विखारी घाण स्वच्छ करण्यास आता आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनीच कार्यरत आणि कार्यतत्पर व्हावे, अशी अपेक्षा सामान्य शहरवासीयांनी केली, तर ते वावगे ठरू नये. अर्थात, त्यांचे हात किती मोठ्या आणि कशा स्वरूपाच्या दगडाखाली अडकले आहेत, हे यांनाच माहीत. त्यामुळे त्यांना ते कितपत शक्य आहे, हे देखील गुलदस्तात आहे. पाव्हण्यांच्या काठीने हे साप मारले जावेत, मोडली, तर पाव्हण्याची काठी मोडेल, या हेतूने लक्ष्मणभाऊंनी ही कळकळ व्यक्त केली आहे काय, यावर कालपरत्वे अलाहिदा संशोधन करणे आवश्यक आहे.

———————————————————-

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×