शहर राष्ट्रवादी मृतमेंदू, बंदमेंदू अगर मंदमेंदू झाली आहे काय?
एखादी व्यक्ती डेडब्रेन, ब्लॉकब्रेन, ड्रेन्डब्रेन झाली म्हणजे मृतप्राय झाली, अशी वैद्यकीय संकल्पना आहे. त्या व्यक्तीचे शरीर जीवंत असते, मात्र मेंदू काम करीत नाही. अशीच काहीशी अवस्था पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची झाली आहे काय, अशी धारणा शहरातील काही मंडळींनी करून घेतली आहे. त्यामुळे शहर राष्ट्रवादी मृतमेंदू, बंदमेंदू अगर मंदमेंदू झाली आहे काय, असा प्रश्न, धारणा धारण केलेल्या मंडळींमुळे सांप्रतला निर्माण होतो आहे. मेंदूक्षत झालेल्या शहर राष्ट्रवादीला आपला मेंदू बळेच स्वीकारायला लावण्याचा प्रयत्न या धारणाग्रस्त मंडळींनी चालवला आहे. महत्त्वाचे असे की इतरत्र नको असलेली ही मंडळी, आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही धुरिणांनी स्वतःहून बोकांडी घेतली आहेत. वस्तुतः ही इतरत्र नको असलेली मंडळी, शहरालाही नकोच आहेत. मात्र, ही नको असलेली मंडळी अगर माणसे कोण यावर सध्या बहुपेडी संशोधन चालू आहे.
शहराला नको असलेली माणसं हटवा, अशी कळकळ व्यक्त करून पिंपरी चिंचवड शहर भाजपचे माजी अध्यक्ष आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप अनेकांच्या पायात साप सोडून गेले. आता ही नको असलेली माणसे कोण, याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न शहरातील प्रत्येक राजकारणी, प्रसिद्धी माध्यमे, पिंपरी चिंचवड महापालिकेचे अध्वर्यू आणि सामान्यजन आपापल्या परीने करतो आहे. आता या प्रयत्नात अडचण एव्हढीच की, प्रत्येकाकडे नको असलेल्या माणसांची स्वतःची यादी आहे. त्यापैकी कोणती माणसे लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या मनात आणि डोक्यात आहेत, यावर प्रत्येकाची आपली मते, धारणा आणि यादी आहे. लक्ष्मणभाऊंच्या मनात आणि डोक्यात कोण आहेत, हे त्यांनी जाहीर करेपर्यंत तरी गुलदस्तात आहे. शहराला नको असलेली ही माणसे हटवायची कोठून, भाजपमधून, महापालिकेतून, इतर कोणत्या पक्षातून, की सरळ शहरातून हे देखील गुलदस्तातच आहे.
ज्यांना शहरातून हटवायचे आहे, अशांपैकी ज्यांच्या नावावर सार्वमत होण्याची शक्यता आहे, अशा स्वतःला अतिमेंदूवान समजणाऱ्या काही माणसांच्या कच्छपी, सध्या शहर राष्ट्रवादीचे स्वतःला हुशार म्हणवणारे महाभाग लागले आहेत. आता या अतिमेंदूवान माणसांशिवाय राष्ट्रवादीला आणि स्वतःलाही दुसरा तारणहार नाही, अशी धारणा या महाभागांमध्ये निर्माण झाली आहे अगर करून देण्यात आली आहे. शहर राष्ट्रवादीत कोणीही मेंदूवान उरला नाही आणि ही अतिमेंदूवान माणसे राष्ट्रवादीत आली तरच राष्ट्रवादीची सत्ता येईल, अन्यथा नाही. त्यामुळे अति असलेला मेंदू पक्षात घ्यायचाच असा चंग बांधून, हे हुशार महाभाग, शहर राष्ट्रवादीला आणि स्वतःलाही मृतमेंदू, बंदमेंदू आणि मंदमेंदू ठरवीत आहेत.
पिंपरी चिंचवड शहर भाजपला नको असलेली अगर शहर भाजपला नाकारणारी अनेक माणसे सध्या राष्ट्रवादीच्या रांगेत आहेत. आता महत्त्वाचे हे आहे, की या रांगेत कोणाचा क्रमांक कितवा, हे कोणी ठरवायचे. अगोदरच पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादीची स्वतःची मोठी रांग आहेच. मग हे नव्याने रांगेत येऊ इच्छिणारे मध्येच घुसवायचे, की मागे उभे करायचे, यावर राष्ट्रवादीत मसलत आणि मंथन होणे गरजेचे आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत स्वाहाकार, भ्रष्टाचार आणि अनागोंदी निर्माण करणारेच, आता भाजप बदनाम करून राष्ट्रवादीच्या रांगेत मध्येच घुसू पाहात असतील तर त्यांना थोपवणे अगर दूर ठेवणे यासाठी राष्ट्रवादीच्या धुरिणांनी आताच ठाम धोरण ठरवणे अति गरजेचे आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, सत्ताधारी भाजप आणि सत्ताकांक्षी राष्ट्रवादी, यांच्यात अनेक बदल आणि आवकजावक होईलच. यात स्वतःला अतिमेंदूवान समजणारे, मात्र वास्तवात स्वाहाकारी, भ्रष्टाचारी, सडक्या मेंदूचे असलेले पहिल्या फळीत असतील. त्यामुळे आता शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने, स्वतःचे मेंदूवान वापरायचे, की स्वतःला मृतमेंदू, बंदमेंदू, मंदमेंदू ठरवून, इतरत्रचे सडके मेंदू स्विकारायचे, यावर स्वसंशोधन करावे. अन्यथा शहर राष्ट्रवादी मेंदूहीन आहे, यावर शहरवासीयांकडून शिक्कामोर्तब होईल.
———————————————————–