भाजपाई सत्ताकाळात शहराच्या नावलौकीकला बट्टा!

माणसाला वास्तवदर्शी दोन डोळे असतात आणि तिसरा डोळा असतो, तो अंतर्मनाचा, ज्याला अंतरचक्षू म्हणतात. हा अंतरचक्षू खोटे बोलत नाही, कारण तो आपल्या सद्सद्विवेक बुद्धीचा असतो. या सद्सद्विवेक चक्षुचे खरे कार्य स्थितीअवलोकन, स्थितीपरीक्षण आणि स्थितीआकलन हे असते. अर्थात हे करण्यासाठी, आपला तिसरा डोळा, अंतरचक्षू, मोतीबिंदू अगर नासुर विरहित असावा. स्वहिताचा अगर आपण दाखवू तेच जग पाहिल या आत्ममग्नतेचा मोतीबिंदू आणि अथवा नासुर या तिसऱ्या डोळ्यात असेल, तर सत्य विवेचन होत नाही. या एव्हढ्या गंभीर, दार्शनिक विवेचनाचा मतितार्थ एव्हढाच की साफ नजरेने पिंपरी चिंचवड शहरातील भाजपाई सत्ताकाळ पहिला जावा. या सत्ताकाळात शहरातल्या काही भाजपाई आपमतलबी मंडळींनी या शहराच्या नावलौकिकाला कसा बट्टा लावला, हे पाहण्याचा खरा प्रयत्न शहरातील भाजपाईंसकट समस्तजनांनी करावा.

२०१७ मध्ये सत्तेत येताना भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे समस्त अनुयायी, अर्थात समस्त भाजपाईंनी या शहराला एका वेगळ्या कारभाराची स्वप्ने दाखविली. यापूर्वीचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा सत्ताकाळ, किती भ्रष्टाचारी आणि गदळ अगर घाणेरडा आहे, याची अतिरंजित चित्रे, भाजपाईंनी शहरवासियांसमोर रंगवली. आम्ही आता जो कारभार करू, तो भय आणि भ्रष्टाचार मुक्त, लोकहीतदक्ष आणि पूर्ण पारदर्शी असेल अशी दवंडी, अगदी पार्श्वभाग बडवून पिटली. मात्र, या भाजपाईंचा गेल्या छपन्न महिन्याचा सत्ताकाळ पाहता, या काळात भाजपाईंनी वेगळ्याच कारणासाठी आपला पार्श्वभाग बडवला, असे समस्तजनांस आता वाटू लागले आहे. सत्ता बदलली, आता परिस्थिती बदलेल, अशा अपेक्षेत असलेल्या समस्तजनांचा पुरता भ्रमनिरास झाला आहे. ‘पार्टी, विथ डिफर’ असा नावलौकिक असलेला भाजपाई कारभार, या शहरासाठी मात्र, “पार्टी, फॉर सफर” ठरला, हे विशेष महत्त्वाचे.

सुरुवातीपासूनच भ्रष्टाकार आणि स्वाहाकार!

पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपाई सत्ता स्थापन झाल्यावर, एक भद्र, म्हणजेच सुगढ, सुसंस्कारित, सुकर आणि सुगम असा कारभार या शहराला मिळेल, अशा आशेवर सुखवलेला शहरवासी, सुरुवातीपासूनच अभद्र कारभाराचा नमुना पाहतो आहे. काही तथाकथित चाणक्यांनी या महापालिकेच्या कारभाराचा ताबा घेतला आणि अभद्र प्रकारे या शहराचा नावलौकिक धुळीस मिळाला. टक्केवारीच्या गदळ वरवंट्याखाली हे शहर पिसण्यास, या तथाकथित भाजपाई चाणक्यांनी सुरुवात केली. जेवणात लोणचे, पापडाएव्हढी असलेली ही टक्केवारी. या भाजपाईंनी आक्खे जेवणच टक्केवारीचे केले आणि निसुरपणे भुरके मारण्यास सुरुवात केली. हे भुरके, ओंगळपणे दोन्ही हातांवर ओघळलेले दिसू नयेत म्हणून, समाजाचा खराखुरा तिसरा डोळा असलेला पत्रकार कक्ष मोडून, या भाजपाईंनी पत्रकारांना बेदखल केले. परदर्शीपणाचा आव आणणाऱ्या भाजपाईंना आपल्या करतुती लपवण्याची गरज भासली, तिथेच यांचा सत्ताकाळ किती गदळ असेल याचा उघड खुलासा झाला. अचानक सत्ता आल्याने भाजपाई मंडळी बावचळली असतील, सुधारतील, म्हणून शहरवासीयांनी काहीसे दुर्लक्ष केले. मात्र, आता हे दुर्लक्ष समस्तांच्या अंतरचक्षुत, म्हणजेच तिसऱ्या डोळ्यात नासुर बनून राहिले आहे.

गेल्या छपन्न महिन्यांचा भाजपाईंचा पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताकाळ पाहता, भ्रष्ट कारभाराचा गदळ नमुना म्हणून या कारभाराची गणती करावी लागेल. ठेकेदार, राजकारणी यांची अभद्र युती करून, किंबहुना, स्वतःच ठेकेदारी करून, या भाजपाईंनी राजकारणातील गदळ प्रवृत्तीचा कळस गाठला आहे. “कोणीही यावे, टिकली मारून जावे, हसू नाय, खेळू नाय, गपचूप बसावे”, या खेळाप्रमाणे प्रत्येक भाजपाईला आपली टिकली मारण्याची आणि गप्प बसण्याची संधी मिळवून देणारा कारभार करून शहरवासीयांच्या अंतरचक्षुत म्हणजेच तिसऱ्या डोळ्यात माती घालण्याचा प्रकार केला आहे. मात्र, हा तिसरा डोळा असलेला जनसामान्य आपल्या खडळलेल्या डोळ्यांमुळे पेटला तर काय, याचा विचार हे भाजपाई अजूनही करीत नाहीत. पिंपरी चिंचवड शहराला आपली माय माऊली समजणारा आणि आपले जीवनव्यापन करणारा हा सामान्य माणूस येत्या निवडणुकीत खवळला तर सत्ता जाईल, हे या भाजपाईंच्या अंतरचक्षुला, म्हणजेच तिसऱ्या डोळ्याला का कळत नसावे, हा खरा प्रश्न आहे. वेद, पुराणे हा समस्त भाजपाईंचा जिव्हाळ्याचा विषय असल्याने, त्यातीलच एक सत्य मांडावेसे वाटते, ते असे की, वैदिक आणि पौराणिक कथांमध्ये श्री शंकराचे वर्णन हलाहल पचविणारा असे आहे. त्याचबरोबर आपल्या क्रोधायमान तांडवात, आपला तिसरा डोळा उघडून सगळा भवताल दग्ध करण्याची ताकद देखील श्री शंकरात आहे. पिंपरी चिंचवड शहरातील श्री शंकर रुपी सामान्यजन सांप्रत परिस्थितीत शहर भाजपाईंच्या भ्रष्ट, अनाचारी, भोंगळ कारभाराचे हलाहल विष पचावतो आहे, असे कदाचित भाजपाईंना वाटत असावे. मात्र, अचानक हा श्री शंकर क्रोधायमान होऊन तांडव करू लागला आणि मतदानातून त्याने आपला तिसरा डोळा उघडला, तर आपला सत्ताभवताल जळून खाक होईल, याचे भान या भाजपाईंना आले आहे काय?

———————————————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×