महापालिकेचे चाळीशीत पदार्पण! (भाग १)

११ ऑक्टोबर, १९८२ रोजी अ वर्ग नवनगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर होऊन पिंपरी चिंचवड महापालिकेची स्थापना झाली. पिंपरी, चिंचवड, भोसरी, आकुर्डी-निगडी या चार गावांच्या एकत्रिकारणामधून तयार झालेल्या नवनगरपालिकेचे महानगरपालिकेत रुपांतर होताना, पिंपळे निलख, पिंपळे गुरव, सांगवी, थेरगाव, काळेवाडी, राहाटणी, फुगेवाडी आणि वाकड, रावेत, मोशी, कुदळवाडीचा प्राधिकरण आणि एमआयडीसीत समाविष्ठ भाग एकत्रित करण्यात आला. महापालिका तयार झाली, आज या महापालिकेने चाळीसाव्या वर्षात पदार्पण केले, तरी या शहराला, शहर म्हणून कधीही एकसंघपणा आला नाही. वेगवेगळ्या गावांचे भौगोलिक एकीकरण केवळ झाले, मात्र, प्रत्येक गावची आणि तिथल्या मंडळींची वेगळी ओळख कायम अबाधित ठेवण्यात आली. दरम्यानच्या काळात १९७२ च्या दुष्काळाने पोळली गेलेली, हातावर पोट घेऊन आलेली मराठवाडा, विदर्भ, खानदेश, या लांबच्या भागातील जिल्ह्यांसह, शहराच्या आजूबाजूच्या पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील मंडळी या शहरात स्थायिक झाली.

महात्मा गांधींच्या पत्नी कस्तुरबा यांचे, केवळ प्रतिजैविके म्हणजेच अँटिबायोटिक औषधे वेळेत आणि पुरेसी मिळाली नाहीत म्हणून निधन झाले, या बाबीचा सल म्हणून तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी हिंदुस्थान अँटिबायोटिक्स या नीमशासकीय उद्योगाची या शहरात स्थापना केली. त्यानंतर टाटा, बजाज, फिरोदिया, किर्लोस्कर, गरवारे या देशी उद्योगसमूहांसह थरमॅक्स, ग्रीव्हज, अल्फा लावल, सँडविक, एसकेएफ, एलप्रो अशा विदेशी भांडवलाच्या उद्योगांची आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या छोट्यामोठ्या उद्योगांची, औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून शहरात भर पडली. पिंपरी चिंचवड शहर कामगारनगरी म्हणून नावारूपाला आले. या कामगारांना सामावून घेण्यासाठी नवनगर विकास प्राधिकरण आले. या सर्व घटकांमुळे शहराचा चेहरा मोहरा बदलला. स्थानिक प्रशासन असावे म्हणून मग सुरुवातीला ४ मार्च, १९७० रोजी पिंपरी चिंचवड नवनगरपालिका सुरुवातीच्या चार गावांना एकत्र करून स्थापन करण्यात आली. ही पिंपरी चिंचवड नवनगरपालिका दरडोई उत्पन्नासाठी आशिया खंडात श्रीमंत म्हणून ओळखली जात होती. १९८२ मध्ये महापालिकेत रूपांतर झाल्यावरही उत्पन्न आणि लोकसंख्या यांचे प्रमाण पाहता ही पिंपरी चिंचवड महापालिका १९९४ पर्यंत दरडोई उत्पन्नात वरच्या क्रमांकावर होती.

कामगार, कष्टकऱ्यांचे शहर म्हणून पिंपरी चिंचवड शहराची चर्चा झाली. गावकिभावकी पर्यंत सिमीत असलेले शहर, सर्वसमावेशक होऊ लागले. अगदी बांधकाम मजुरापासून उच्च शिक्षितापर्यंत प्रत्येकाला या शहरात रोजगार आणि आसरा मिळू लागला. प्रत्येकाच्या कुवती आणि ऐपतीप्रमाणे या शहरात राहणाऱ्यांची संख्या वाढू लागली. इथल्या स्थानिक शेतकरी, जमीन मालकांनी चाळी बांधल्या. भाडेकरू, चाळ मालक यांच्या वादातून स्थानिकां व्यतिरिक्तचे राजकारण तयार होऊ लागले. कामगारांचे प्रश्न निर्माण होऊ लागले, कामगार चळवळी सुरु झाल्या. बहुतांश भाडेकरू कामगार, कष्टकरी असल्याने “नाहि रे” गटाचे प्रतिनिधीत्व वाढले. दुष्काळातून आलेल्यांना सामावणाऱ्या झोपडपट्ट्या उभ्या राहिल्या. वंचित, शोषितांची संख्या वाढू लागली. त्याचबरोबर या कामगार, कष्टकरी, वंचित, शोषित समाजाची वाढलेली संख्या, स्थानिक मंडळींच्या राजकारणाचा अविभाज्य भाग बनू लागली. मात्र, राजकीय वरचष्मा स्थानिकांचाच राहिला.

या स्थानिकांच्या राजकारणात निर्णायक शक्ती म्हणून कामगार, कष्टकऱ्यांची संख्या असली तरी, इथल्या स्थानिकांनी आणि धुरंधर राजकारण्यांनी इथल्या दलित, कामगार, कष्टकरी चळवळी मोडीत काढण्याचा सदोदित प्रयत्न केला आहे. मग ती टेल्कोची कामगार लढाई असो, की बजाज ऑटो कंपनीच्या बाहेर, कामगार आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिसी गोळीबारात मारला गेलेला भागवत असो, क्रोम्प्टन ग्रीव्हज मधून अचानक हाकलले गेलेले कामगार असोत, प्रत्येकावर दमनशक्ती वापरून कामगार चळवळ मोडीत काढण्याचे प्रयत्न इथल्या स्थानिक वतनदार, जमीनदार, धनदांडग्यांनी कायम केले आहेत. वंचित, शोषित, कामगार, कष्टकरी यांची एकजूट या शहरातील स्थानिक राजकारणाने आणि राज्यकर्त्यांनी कधीच होऊ दिली नाही.

जहाल समाजवाद्यांपासून अगदी दलित चळवळी पर्यंत कोणतीही वंचित, शोषित, कामगार, कष्टकरी समाज घटकांची मोठी एकसंघ ताकद या पिंपरी चिंचवड शहरात उभी राहू शकली नाही. शहर नावारूपाला येऊ लागले, शहराचा भौतिक विकास होऊ लागला. अर्थातच या विकासाची पायाभरणी इथल्या स्थानिकांच्या जमिनीवरच झाली. हे शहर आणि या शहराचा मालकी हक्क, ही आमचीच मक्तेदारी असल्याची भावना इथल्या स्थानिकांमध्ये निर्माण झाली. मात्र, आपली कर्मभूमी समजून या पिंपरी चिंचवड शहरात स्थायिक झालेल्या कामगार, कष्टकरी, वंचित, दलित समाजाची संख्या वाढली तरी, इथल्या मक्तेदारीला हात लावण्याची ताकद त्यांच्यात कधी निर्माण झाली नाही. लाखांच्या पटीत, एका हाताच्या बोटांवर मोजता येणाऱ्या शहराच्या लोकसंख्येला मोजण्यासाठी, हातापायांच्या बोटांबरोबरच बाजूवाल्याच्या बोटांचा आधार घ्यावा लागतो आहे.

गावकीचा तोंडवळा घेऊन तयार झालेले हे शहर लोकसंख्येने जसजसे वाढत गेले, तसतसा विकासही झालाच. मात्र, हा विकास होताना स्थानिक वतनदार, मक्तेदार आणि शहराची वाढलेली वंचित, शोषित, कामगार, कष्टकरी घटकांची लोकसंख्या, यांच्यात असलेली सामाजिक, आर्थिक आणि वैचारिक दरी कायम राहिली. किंबहुना, ती मोठी आणि जास्त खोल झाली. शहराचा विकास आणि समृद्ध भवताल वाढलेल्या लोकसंख्येपेक्षा वतनदार, मक्तेदार यांच्या मुठीतच राहिला. काळानुरूप लौकिकार्थाने झालेला हा विकास, आपल्या मक्तेदारीतून सुटू नये, म्हणून या वतनदार, मक्तेदारांनी आपल्या मुठी घट्ट केल्या. त्या इतक्या घट्ट झाल्या, की विकास कोणासाठी आणि का, याचा विचार आता या वाढलेल्या लोकसंख्येचा मनात निर्माण झाला आहे. भौतिकतेने हे पिंपरी चिंचवड शहर असले तरी, हे आपले शहर आहे, असे म्हणण्याची सोय, शहराच्या वाढलेल्या लोकसंख्येला नाही. ही या शहराची खरी सामाजिक जडणघडण आहे आणि ती तशीच राहावी, अशी ठाम आणि दुर्दम इच्छा इथल्या तथाकथित वतनदार, मक्तेदार भूमीपुत्रांची आहे, हे विशेष!

–––––––––––––––––––––––––––––––––

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×