तो अर्धा तास आणि तर्कांचे राजकीय बाह्यवळण!

शहरातील तीन दिग्गज स्थानिक नेते, एका नेत्याकडे गोळा झाले आणि शहरात चर्चा आणि अफवांचे पेव फुटले. जानेवारी२०२० मध्ये भाजपच्या शहराध्यक्ष पदावरून पायउतार झालेले लक्ष्मणभाऊ जगताप, २०१७ च्या महापालिका निवडणुकीत भाजपचा सत्तासोपानापर्यंतचा मार्ग सुरळीत आणि प्रशस्त करणारे, मात्र भ्रमनिरास होऊन पुन्हा राष्ट्रवादीकडे परतलेले शहरातील करतुमअकरतुम नेतृत्व आझमभाई पानसरे आणि शहरातील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार अण्णा बनसोडे या तिघांची एकत्रित भेट आमदार अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयात झाली. दिवाळीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे भाऊबीजेला आमदार लक्ष्मणभाऊ जगताप, आपला भाऊपणा निभावण्यासाठी आणा बनसोडे यांच्या कार्यालयात दाखल झाले. विशेष बाब म्हणजे, भाऊ येणार म्हणून भाई थांबून राहिले.

पिंपरी चिंचवड शहराच्या एकंदर राजकारणावर आणि शहरात घडणाऱ्या राजकीय घटनांवर बारकाईने लक्ष ठेवणारे राजकीय विश्लेषक या तीनही दिग्गजांच्या एकत्रित भेटीमुळे आता तर्कवितर्क करू लागले आहेत. धोपट रस्ता सुरक्षित आणि निर्वेध नसला तर, बाह्यवळण वापरले जाते, हा परिपाठ आहे. या तीन दिग्गजांच्या भेटीमुळे पिंपरी चिंचवड शहरातील राजकीय बाह्यवळण ठरणारी ही भेट असल्याची चर्चा शहरभर आहे. आता हे बाह्यवळण शहरातील राजकारणाला कोणत्या वळणावर आणून सोडणार आहे, हे अजून ठरायचे आहे, किंबहुना, ही भेट म्हणजे राजकीय बाह्यवळण आहे काय, हेही अजून ठरायचे आहे. वस्तुतः हे तीनही नेते आणि त्यांचे समर्थक सरळसरळ तीन चतुर्थांश किंवा अगदी गेला बाजार दोन त्रितियांश शहरावर आपला वरचष्मा राखून आहेत. या तीन सन्माननियांचे चौथे मान्यवर, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे त्या विशिष्ट वेळी तिथे हजर नव्हते, मात्र त्यांची मानसिकताही या तीन मंडळींच्या मानसिकतेशी मेळ राखणारी आहे. या सर्वांची वेगवेगळी वैशिष्ट्ये आणि उपयोग आहेत आणि शहराच्या राजकारणावर मोठा प्रभाव टाकण्याची ताकदही.

राजकीय भ्रमनिरास!

पिंपरी चिंचवड शहराचे भाई आणि भाऊ, अण्णांकडे जमले. वस्तुतः आझमभाई पानसरे आणि लक्ष्मणभाऊ जगताप हे दोनही नेते, या शहरात आपले वर्चस्व आणि महत्व राखून आहेत. महत्त्वाचे म्हणजे या दोनही विभूतींचा स्थानिक भाजपाईंकडून पुरता भ्रमनिरास झाला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेची सत्ता राष्ट्रवादीच्या हातातून अक्षरशः हिसकावून घेऊन भाजपच्या हातात देण्यात या दोनही विभूतींचा मोठा वाटा आहे. शहर भाजपचे अध्यक्षपद लक्ष्मणभाऊ जगताप यांनी जानेवारी २०२० मध्ये भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या ताब्यात दिले. त्यानंतर ज्या पद्धतीने कारभार चालणे अपेक्षित होते, त्या पद्धतीने तो न चालता, केवळ भ्रष्टाचार आणि अनाचार बोकाळला, अशी धारणा निर्माण झाली आहे. तर भाजपचा एकंदरच कारभार शहराला मारक असल्याचे बोलले जात आहे. एकूण काय तर, भाजपाई सत्ताकाळ हा सर्वसामान्य शहरवासीयांचा भ्रमनिरास करणारा ठरला आहे. विशेष म्हणजे खाजगीत चर्चा करताना भाई आणि भाऊ या बाबीची कबुलीही देतात. अशा रीतीने भाजपकडून राजकीय भ्रमनिरास झालेले हे दोन नेते एकत्र आले तर, शहराच्या राजकारणाला कोणते बाह्यवळण मिळणार याबाबत चर्चा तर होणारच. तशी ती सुरूही झाली आहे.

राजकीय पादत्राणे बाजूला ठेऊन मैत्री आणि भाऊबीज यांची बुज राखण्यासाठी लक्ष्मणभाऊ जगताप, अण्णांकडे आले असे दृश्य निर्माण करण्यात आले. त्या दृश्याची परिपूर्ती करण्यासाठी नीता ढमाले यांनी भाऊंना ओवाळले देखील. दरम्यानच्या काळात सुमारे अर्धा तास भाई, भाऊ आणि अण्णा तिघेच एकत्रित चर्चा करीत होते. त्या दालनात या तिघांव्यतिरिक्त कोणीही नव्हते आणि काय चर्चा झाली, यावर चर्चा करण्याचे धारिष्ट्य तेथे उपस्थित असलेल्या पत्रकारांनाही नव्हते. अण्णांकडे दिवाळी फराळाला आमंत्रित करण्यात आलेले काही पत्रकार या प्रकारामुळे वेडावले, हे मात्र निश्चित. मग खोदकामाची कायम सवय अंगी असल्याने काहींनी आता शहरात सत्ता कोणाची येणार यावर प्रश्न उपस्थित केला.

लक्ष्मणभाऊंनी “पिंपरी चिंचवडकरांची” असे उत्तर देऊन संभ्रम अजून घट्ट केला. मग, भाऊंनी बारामतीकरांचे वर्चस्व नाकारले का, की पक्ष कोणताही असो, शहरवासी महत्त्वाचे असे म्हणून भाजप नाकारली का, यावर आता चर्चा होते आहे. मात्र, भाई, भाऊ आणि अण्णा यांच्यात त्या अर्ध्या तासात काय चर्चा झाली, हे अजूनही गुलदस्तात आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेची होऊ घातलेली निवडणूक किती आणि कशी रंगतदार होईल, याची छोटीशी चुणूक दाखवणारी ही भाई, भाऊ आणि अण्णांची भेट झाली, अण्णांनी ती घडवून आणली. पक्षीय धोपट मार्ग सोडून शहराच्या हिताचे राजकीय बाह्यवळण या भेटीमुळे निश्चितच घेतले जाणार, हे मात्र महत्त्वाचे!

——————————————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×