शहरासाठी आता भाजपाईंची, फडणविशी गाजर, मुळ्याची शेती!

पाच वर्षांपूर्वी पिंपरी चिंचवड शहर भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनतेला केवळ गाजरे दाखवत असल्याचे मोठमोठ्या जाहिरात फलकांवर गाजरांची चित्रे वापरून, अगदी आरडाओरडा करून सांगितले. त्यानंतर आपली नवीन गाजरे त्यांनी त्यावेळच्या निवडणुकीच्या बाजारात आणली. शहरातील मतदारांनी मग, भाजपची गाजरे प्रमाण मानून, त्यांना सत्ता दिली. मात्र, या पाच वर्षांच्या आपल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सत्ताकाळात भाजपची गाजरे, आडदांड मुळे बनून या शहरातील सामान्यजनांना अनेक प्रकारे त्रास देणारी ठरली आहेत. “ना भय ना भ्रष्टाचार”, “सबका साथ, सबका विकास”, त्यालाच जोडून आता “सबका विश्वास” अशी विलोभनीय गाजरे गेल्या पाच वर्षात शहर भाजप आणि त्यांच्या शहराध्यक्षांसह स्थानिक नेत्यांनी आपल्याच पक्षातील नगरसदस्यांना आणि शहरवासीयांना दाखविली आहेत. मात्र, प्रत्यक्षात इतर स्वपक्षीय नगरसदस्यांना भयभीत ठेऊन आपल्या आणि आपल्या बगलबच्च्यांच्या तुंबड्या भरणारा भ्रष्टाचार केला आहे. काही लोकांना साथीला घेऊन त्यांचाच विकास करण्याचा या स्थानिक भाजपाई नेत्यांचा भ्रष्टाचार लक्षात आल्यामुळे आता काही भाजपच्या नगरसदस्यांनी कमळाबाईंना सोडचिठ्ठी दिली आहे किंवा देण्याच्या तयारीत आहेत. 

आपल्या अब्रूचे खोबरे वेशीवर वाटले जाणार या भीतीने भयभीत झालेल्या पिंपरी चिंचवड भाजपच्या माजीआजी शहाराध्यक्षांनी आता आपली शिल्लक अब्रू राखण्यासाठी राज्याचे भाजपाई माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे. देवेंद्रजींनी आता भाजप सोडण्याच्या तयारीत असलेल्या शहरातील नगरसदस्यांशी संपर्क करण्यास सुरुवात केली असून, नव्याने “फडणविशी गाजरे” या संपर्कात येणाऱ्यांना दाखविण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक प्रभागासाठी भाजपतर्फे दोन कोटींचा वेगळा पक्षनिधी मिळणार असल्याचे आता या भाजप त्यागणाऱ्या नगरसदस्यांना सांगण्यात येत आहे. मात्र,भाजप त्यागणाऱ्या ज्या लोकांशी देवेंद्रजींनी संपर्क केला, त्यातील काहींनी आजीमाजी शहराध्यक्षांवर आरोपांचा भडिमार करून, पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा हट्ट कायम ठेवला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त ताकद दिलेले भाजपाई शहराध्यक्ष, या प्रकाराने हतबल झाले असल्याची चर्चा सुरू झालीच आहे, त्याचबरोबर भाजपसह, फडणवीस यांची देखील नाचक्की होणार आहे.

आजीमाजी शहराध्यक्षांची भ्रष्टाचारी “भानामती”!

राष्ट्रवादी काँग्रेसने स्थानिक नेतृत्व तयार होऊ दिले नाही, असे म्हणत या आजीमाजी भाजपाई शहाराध्यक्षांनी “नाको बारामती, नको भानामती” अशी दवंडी पिटून, आता आमचे निर्णय आम्हीच घेणार असे सांगत स्थानिक पातळीवर शहराचा आणि महापालिकेचा कारभार हाकण्यास सुरुवात केली. मात्र, वकूब आणि लायकी नसली, की काय होते, याचा सर्वोत्कृष्ट नमुना या भाजपाई शहाराध्यक्षांनी शहराला दाखविला आहे. कोणतेही कष्ट न करता भाजपाई लाटेत आणि फडणविशी राजकारणात या मंडळींनी सत्ता कमावली, हे स्वयंस्पष्ट सत्य आहे. त्यावेळी यांनी उभे केलेले दगडही भाजप लाटेत तरुन गेले आणि नगरसदस्य झाले. या आजीमाजी भाजपाई शहाराध्यक्षांनी मग या दगडांनाच शेंदूर फासून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तिजोरीचे भोग इथल्या अधिकाऱ्यांकरवी करविले.

या बळेच शेंदूर फसलेल्या दगडांव्यतिरिक्त, शहराचे नेतृत्व करण्याचा आव आणणाऱ्या पिंपरी चिंचवड शहर भाजपाई माजीआजी शहराध्यक्षांच्या भानमतीमुळे, ज्यांनी भाजपच्या कमळाबाईची संगत केली, त्यांचा मात्र, या पाच वर्षात पुरता भ्रमनिरास झाला आहे. हे दगड सोडून इतरांना साधा नारळ, या भाजपाई माजीआजी शहराध्यक्ष आमदारांनी मिळू दिला नाही. आता हे बाकीचे भ्रमनिरास झालेले आणि सत्तेच्या लाभापासून वंचित राहिलेले लोक, या माजीआजी शहराध्यक्षांच्या भानमतीमधून पुरते बाहेर आले आहेत. त्यामुळे, “यांच्या भानमतीपेक्षा, बारामतीच बारी”, अशी या दगडांव्यतिरिक्तच्या लोकांची भावना झाली असल्यास नवल वाटायला नको. बारामती, भानामती नको म्हणून, या आजीमाजी भाजपाई शहाराध्यक्षांनी जी भानामती, शहरातील लोकांवर केली, ती आता उलटली असून, पाच वर्षांपूर्वी कमावलेल्या सत्त्याहत्तर नगरसदस्यांपैकी किती शिल्लक राहतात आणि त्यातले किती निवडून येतात, हे पुरते “लाखाचे बारा हजार” करणारे ठरणार आहे.

या उलटलेल्या भानमतीचा उतारा साक्षात देव इंद्राकडेही नाही!

बारामतीची भानामती नको म्हणून टाहो फोडणाऱ्या शहर भाजपच्या माजीआजी शहराध्यक्षांनी लोकांवर स्वतःच्या भानामतीचा प्रयोग केला, लोकांना आपल्या भानामतीच्या अंमलाखाली आणले. मात्र ही भानामती उलटल्यामुळे, आणि या मंडळींच्या भानामतीचा अमंल तुटल्यामुळे सावपे झालेल्या लोकांना आता या माजीआजी शहराध्यक्षांचे खरे रूप कळले आहे. लोकांना स्वतःच्या भानामतीच्या अंमलाखाली ठेऊन यांनी केलेला भ्रष्टाचार, त्यातून आलेल्या टक्केवारीतून निर्माण झालेली सुबत्ता, त्यातून चढलेला मद आणि त्यातून निर्माण झालेला गर्व या सगळ्यांची माहिती आता सर्वश्रुत झाली आहे. यांच्या बगलबच्चांची आणि शेंदूर फसलेल्या दगडांची खरी करतूत सगळ्यांना माहीत झाली आहे. त्यामुळे लोक कमळाबाईच्या अंमलाखालून बाहेर पडले आहेत.

या उलटलेल्या भानामतीचा उतारा शोधण्याची पाळी, या माजीआजी भाजपाई शहराध्यक्षांवर आली आहे. त्यासाठी त्यांनी साक्षात देव इंद्राला साकडे घातले आहे. मात्र, आता या देव इंद्राच्या फडणविशी जाणतेपणातून उगवलेली गाजरे देखील, या उलटलेल्या भानामतीवर उतारा देऊ शकत नाहीत. त्यामुळे कमळाबाईच्या पाकळ्या गळून पिंपरी चिंचवड शहराच्या भाजपाई माजीआजी शहराध्यक्षांच्या हाती केवळ कमळाचा दांडा उरेल काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्याहीपुढे या कमळदांड्याचे रूपांतर मुळ्यात होऊन, तो या माजीआजी शहराध्यक्षांकडे सारला जाणार काय हे पाहणे आगत्याचे ठरणार आहे!

————————————————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×