विजय गुलाबी आणि हिरव्या गांधींचाच!

चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीसाठी २६ फेब्रुवारी रोजी मतदान झाले. अनेक तर्ककुतर्क लागले जात आहेत. कोणत्या भागातून कोणाला जास्त मतदान होईल, कोणता भाग कोणाला तारक अथवा मारक ठरणार यावर गल्लीबोळात चर्चा सुरू आहेत. कोण कुठून चालले, कोणाला मतदारांनी चालवले याहीपेक्षा अगर कोणत्याही उमेदवारापेक्षा सगळ्यात जास्त आणि संपूर्ण मतदारसंघात सलग आणि अव्याहत चाललेली गोष्ट म्हणजे “कागदी गांधी” हे कागदी गांधी सर्वव्यापी, सर्वस्थळी, सर्व उमेदवारांसह सर्व मतदारसंघाने सुखनैव आणि सढळ चालवले. त्यामुळे चिंचवड आणि कसबा या दोनही मतदारसंघात  मतदारसंघात कोणताही उमेदवार निवडून आला तरी विजय मात्र “कागदी गांधीचाच” यातही “गुलाबी गांधी आणि हिरवे गांधी” यांचाच बोलबाला या दोनही विधानसभेत होता. आता प्रश्न निर्माण होतो तो ही “गांधीगिरी” कोणत्याही उमेदवाराने का आणि कशी केली आहे याचा. 

चिंचवड विधानसभा निवडणुकीत गांधींचा कसा प्रभाव होता याचा उहापोह करण्यापूर्वी निवडणुकीत मूळ मुद्दे के होते हे पाहणे अगत्याचे आहे. भाजपचे माजी शहराध्यक्ष आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या मतदारसंघाची निवडणूक भाजपच्या सल्ल्याने निवडणूक आयोगाने अगदी घाई करून लावली आणि त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली. लक्ष्मणभाऊंच्या निधनाने निर्माण झालेली सहानुभूती रोखीत उतरवण्याचा हा प्रयत्न होता. मात्र, सुरुवातीलाच ही सहानुभूती भाजपने गमावली. उमेदवारी कोणाला याचा भाऊंच्या घरातच रंगलेला कलगीतुरा याला कारणीभूत होता. मग सहानुभूती विशेष उपयोगी पडणार नाही, हे स्पष्ट झाल्यावर मग विकास वगैरे बाबी भाजपने तोंडी लावायला सुरुवात केली. राष्ट्रवादी काँग्रेसने विकासाचा आणि भाजपच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला. अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना राष्ट्रवादीने ऐनवेळी नाकारल्याने त्यांच्या बाबतीत सहानुभूती मात्र निर्माण झाली होती. 

मात्र, कोणत्याही परिस्थितीत निवडणूक जिंकायचीच या अहंगंडाने पछाडलेल्या भाजपने मग शेवटचे हत्यार म्हणून या मतदारसंघात “गांधी” वापरायला सुरुवात केली. हा गांधींचा वापर इतका जोरदार करण्यात आला की, एका मतदाराला दोन गांधी भेटले. लाजेकाजेने मग राष्ट्रवादी देखील गांधीगिरीवर उतरली. काही प्रमाणात राहुल कलाटेंनी देखिल लोकांना गांधींचे दर्शन घडवले. मतदारसंघात गांधींचा यथेच्छ संचार सुरू झाला. नथुराम गोडसेंचे गोडवे गाणारी भाजपाई मंडळींनी गांधींच्या चरणी लिन होऊन त्यांच्याच आसऱ्याने निवडणूक लढवली. अनेकदा मतदारसंघात एखाद्या उमेदवाराच्या पश्चरासाठी फिरताना गांधींना इतर उमेदवारांच्या समर्थकांनी अटकाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजपने या गांधींच्या संरक्षणासाठी अवघे पोलिसदल तैनात करून टाकले. त्यामुळे अक्षरशः पोलीस संरक्षणात भाजपच्या वतीने गांधी मतदारांना भेटत होते. 

चिंचवड विधानसभेची ही पोट निवडणूक कालवश आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पत्नी भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप, महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे उमेदवार विठ्ठल तथा नाना काटे आणि ज्यांच्या उम्मीदने बाकीच्या उमेदवारांच्या उम्मीदवर वार केला आहे, अशा अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांसह इतर पंचवीस उमेदवार लढताहेत. विहित वेळेत पन्नास टक्के मतदान झाले आहे. आता हे मतदान होण्यासाठी कोणत्या उमेदवारांच्या वतीने मतदारांना “गांधी” भेटले हे महत्त्वाचे. गांधी योग्य मतदारांपर्यंत पोहोचलेत काय, योग्य प्रमाणात “गुलाबी गांधी आणि हिरव्या गांधींनी” मतदारांना कसे खूष केले आहे, यावर ही निवडणूक अवलंबून आहे. त्यामुळे निवडणुकीत कोणत्याही उमेदवाराची सरशी झाले तरी, विजय मात्र गुलाबी आणि हिरव्या गांधींचाच हे मात्र नक्की!

––——————————————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×