लाटेमागून लाट आली, जीव यांचा हरखला!

कोविड१९ पुन्हा एकदा जोर धरू लागल्याने या लाटेवर स्वार होऊन आपली नय्या पार करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. कोरोनाच्या या लाटेमुळे ज्यांचा जीव हरखला, अशी एक जमात सांप्रतच्या काळात अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या अवतीभोवती पुन्हा दिसू लागली आहे. आता पुन्हा रेमडेसीविर, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, इतर औषधे, खाटा, गाद्या, उशा, जेवण, चहा, नाष्टा यासाठी धावपळ सुरू होणार किंवा करावी लागणार. यात आता भर पडली ती ” जनजागृतीची “! अनेक लफडी कुलंगडी करून यातला कोणता उद्योग आपल्या पदरात पाडून घेता येईल, यासाठी स्वतःला ठेकेदार किंवा पुरवठादार म्हणवून घेणारी ही जमात आपल्या पोळीवर कोरोनाचं हे तूप ओढण्याचा शर्यतीत सहभागी झाली आहे. अर्थात यात बगलबच्चे, समर्थक, कार्यकर्ते किती आणि खरे उपयोगी किती हा प्रश्न अलाहिदा!

ही मंडळी नवनवीन योजना आणि गमतीदार प्रकाराने अधिकारी, पदाधिकाऱ्यांना भुलवून आपल्याला कोविड चा प्रसाद कसा आणि किती मिळेल याची गणिते मांडण्यात मश्गुल आहेत. याचे एक उदाहरण म्हणजे पिंपरी चिंचवड महापालिकेने नव्याने प्रसूत केलेला जनजागृतीचा फंडा! आता महापालिका पोस्टर, बॅनर, स्टिकर, भित्तिचित्रे यांच्या जोडीने की चेन लोकांना वाटणार आहे. या जनजागृतीसाठी सुमारे सव्वा कोट रुपयांचा मलिदा कोणा पुरावठादाराला मिळणार आहे. नवनवीन प्रकाराने महापालिकेचे जनतेच्या खिशातून आलेले पैसे आपल्या खिशात घालण्याच्या या प्रकाराला अधिकारी, पदाधिकारीच खतपाणी घालतात काय असा संशय यावा इतपत ही ठेकेदारी पोहोचली आहे. तेहतीस लाखांच्या की चेन महापालिका लोकांना वाटणार आहे, या एकाच उदाहरणावरून या गदळ प्रकाराची जाणीव होते. काहीही करून खर्चच करायचा ही एकच मानसिकता यामध्ये असल्याचे जाणवते. हा खर्च करताना आपण काय खरेदी करतो आहोत, अगर त्याची परिणामकारकता किंवा उपयोग किती? त्याने काय साधले जाणार? याचा यत्किंचितही विचार होताना दिसत नाही. केवळ कोणत्याही प्रकाराने महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारायचा म्हणून असले उद्योग केले जात आहेत.  साथरोग कायद्यान्वये मिळालेले सर्वाधिकार काशाहीसाठी आणि कोणाहीसाठी वापरण्याची ही हडेलहप्पी पद्धत पाहून कोविड१९ ची ” लाटेमागून लाट आली, जीव यांचा हरखला! ”  असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×